अकोला : वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोठ्या थकबाकीदार ग्राहकांकडील देयक वसूल करण्याची जबाबदारी महावितरणच्या रणरागिणी यांनी घेतली. त्या कारवाईसाठी थेट ग्राहकांच्या दारात पोहोचत आहेत. चालू आर्थिक वर्षाचे केवळ तीन दिवस शिल्लक असताना अजूनही परिमंडळातून १९० कोटी वसुली बाकी आहे.

वसुलीसाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वणवण भटकंती करावी लागत आहे. प्रतिसाद न देणाऱ्या परिमंडळातील आठ हजार ५०० थकबाकीदार ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. घरी कोणी नाही म्हणून महावितरणच्या वसुली पथकाला दाद न देणारे ग्राहक आणि दहा हजारापेक्षा जास्त रुपयाची थकबाकी असणारे ग्राहक दामिनीच्या रडारवर आहेत. दामिनीकडून थेट वीज मीटर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके (बुलढाणा), अजय शिंदे (वाशीम) आणि अजितपालसिंह दिनोरे यांच्या पुढाकाराने परिमंडळातील तीनही जिल्ह्यात दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. एका दामिनी पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता , उपकार्यकारी अभियंतासह १० महिला अभियंता, कर्मचारी सहभागी असून त्यांच्या मदतीसाठी सुरक्षा रक्षक आणि कारवाई सुरू असलेल्या वितरण केंद्रातील तंत्रज्ञाचा समावेश आहे. यासोबतच वित्त व लेखा विभागाकडून बिलासंबंधी तक्रार असल्यास ती सोडविण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करण्यात येणार आहे.

परिमंडळाअंतर्गत घरगुती‚ वाणिज्यिक‚ औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून १९० कोटी थकबाकी वसूल करायची आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातून ५९ कोटी, बुलढाणा जिल्ह्यातून ९८ कोटी आणि वाशीम जिल्ह्यातून ३३ कोटी ६७ लाख वसूल होणे बाकी आहे.

आठ हजार ५०० ग्राहकांवर कारवाईचा बडगा

वीजबिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या परिमंडळातील आठ हजार ५०० ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील दोन हजार ४९४, बुलढाणा जिल्हा चार हजार २६२ आणि वाशीम जिल्ह्यातील एक हजार ७४४ ग्राहकाचा समावेश आहे. संपूर्ण वीजबिलासह ३१० रूपये पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय या ग्राहकाचा वीज पुरवठा पुर्ववत करता येणार नाही. त्यामुळे महावितरणची कारवाई टाळण्यासाठी चालू तसेच थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये थकीत बिल वसुलीसाठी महावितरणच्या यंत्रणेची चांगलीच धावाधाव सुरू असल्याचे चित्र आहे.