गोंदिया : गेल्या आठ दिवसांपासून महावितरण कंपनीने विद्युत बिलाच्या थकबाकीपोटी शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत मोटार पंपची जोडणी कापण्याचा सपाटा सुरू केला आहे. या विरोधात सडक अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा प्रश्न आ. मनोहर चांद्रिकापुरे यांच्या समोर उपस्थित केला. यावर तोडगा काढण्यासाठी तक्रारदार सर्व शेतकऱ्यांना चांद्रिकापुरे यांनी आपल्या कार्यालयात बोलावले. यावेळी आमदाराच्या कार्यालयात चांद्रिकापुरे, महावितरणचे नायडू व उपस्थित सर्व शेतकऱ्यांत सकारात्मक चर्चा झाली.
पुढील विषयावर तोडगा निघत नाही तो पर्यंत विद्युत जोडणी कापली जाणार नाही, अशी ग्वाही महावितरणचे नायडू यांनी आमदाराच्या समक्ष शेतकऱ्यांना दिली. शासनाच्या १२/१२/२०२२ च्या परिपत्रकानुसार विद्युत बिल थकबाकी पोटी कुठल्याही शेतकऱ्याची विद्युत जोडणी कापू नय, असे आदेश राज्य सरकारने काढले होते. त्यानंतर आता सरकारच्या सचिवामार्फत असे तोंडी आदेश आलेले आहेत की ज्या शेतकऱ्यांनी ५ वर्षा पासून बिल भरले नाहीत त्यांची विद्युत जोडणी कापून घ्या. ज्यांनी चालू बिल भरले त्यांची जोडणी कट करू नये. परंतु हे दुतोंडी शासन बोलते एक आणि कृती वेगळी करते. त्यामुळे शेतकऱ्यांचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न अत्यंत तीव्र होणार आहे, असे आमदार मनोहर चांद्रिकपुरे म्हणाले.