नागपूर : राज्यात ३० ऑगस्टच्या दरम्यान विजेची मागणी २६ हजार मेगावाॅटवर गेल्यावर विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने एफ गटातील फिडरवर महावितरणला भारनियमन करावे लागले. त्यानंतर पावसामुळे ही मागणी घसरून २१ हजार २३८ मेगावाॅटवर आली होती. परंतु, आताही राज्यातील काही भागात पाऊस असताना विजेची मागणी पुन्हा २६ हजार मेगावाॅटवर गेल्याने वीज कंपन्यांची चिंता वाढली आहे.
पावसाने दडी मारल्याने राज्यात ३० ऑगस्टच्या दरम्यान विजेची मागणी थेट २६ हजार मेगावाॅटवर गेली होती. त्यापैकी २३ हजार ते २४ हजार मेगावॉटची मागणी महावितरणची होती. महावितरणकडे मागणीच्या तुलनेत ९०० ते १,२०० मेगावॉट विजेचा तुटवडा असल्याने त्यांना एफ गटातील फिडरवर भारनियमन करावे लागले. राज्यातील बऱ्याच भागात पाऊस सुरू झाल्यावर कृषी पंपासह पंखे व इतरही विद्युत यंत्राचा वापर कमी झाल्यावर ९ सप्टेंबरच्या दरम्यान मागणी घसरून २१ हजार २३८ मेगावॉटवर आली आहे.
हेही वाचा >>>परंपरागत झडत्यांनी आणली बैलपोळ्यात रंगत; बैलांचे पूजन करून बळीराजाने व्यक्त केली कृतज्ञता
गुरुवारी (१४ सप्टेंबर) राज्यात काही भागात पाऊस असतानाही दुपारी ३.३० वाजता विजेची मागणी २५ हजार ९७६ मेगावॉट नोंदवली गेली. त्यापैकी २१ हजार ३७४ मेगावॉटची मागणी महावितरणची होती. गुरुवारी मागणीनुसार पुरवठा सुरू असला तरी मागणी वाढण्याची प्रक्रिया कायम असल्यास पुन्हा वीज कंपन्यांची अडचण वाढून नागरिकांना भरनियमनाला समोर जाण्याचा धोका आहे. विजेची मागणी वाढल्याच्या वृत्ताला महावितरणच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.
हेही वाचा >>>जाणून घ्या, नागपुरातील तान्हा पोळ्याचा इतिहास, स्वत: राजे रघुजी महाराज भोंसले यांनी…
राज्यातील विजेची सद्यस्थिती
महानिर्मितीकडून १४ सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजता ५ हजार ९६१ मेगावाॅट वीजनिर्मिती सुरू होती. त्यापैकी ५ हजार ४२७ मेगावाॅट औष्णिक, ४७ मेगावाॅट सौर, १४० मेगावाॅट गॅसपासून वीजनिर्मिती केली जात होती. केंद्राच्या वाट्यातून राज्याला ९ हजार ९७५ मेगावॉट तर खासगी कंपन्यांपैकी अदानीकडून ३ हजार १८०, जिंदलकडून १ हजार २२४, रतन इंडियाकडून १ हजार ६७, एसडब्ल्यूपीएलकडून ४४५ मेगावॅट, आयडियलकडून २५८ मेगावाॅट वीज उपलब्ध झाली.
राज्यात सातत्याने विजेच्या मागणीत चढउतार दिसत आहे. मध्यंतरी मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाल्याने महावितरणवर भारनियमन करण्याची पाळी आली. ही समस्या निकाली काढण्यासाठी महानिर्मितीला आणखी सक्षम करून येथील वीजनिर्मिती क्षमता वाढवण्याची गरज आहे.- मोहन शर्मा, महासचिव, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लाॅईज.