नागपूर : राज्यात होळीनंतर विजेची मागणी वाढते. यंदा १२ मार्चला विजेची मागणी २९ हजार मेगावॉटच्या जवळपास होती. परंतु होळीच्या दिवशी गुरुवारी ही मागणी एक हजार मेगावॉटने वाढून ३० हजार मेगावॉट नोंदवली गेली आहे. यंदा प्रथमच ३० हजार मेगावॉटवर मागणी गेली आहे. एकूण मागणीपैकी ३,६७५ मेगावॉट मागणी मुंबईची आहे.

राज्यात मुंबईचा काही भाग वगळता बहुतांश भागात महावितरणकडून वीज पुरवठा होतो. होळीपूर्वी राज्यात फेब्रुवारी २०२५ मध्ये विजेची मागणी २८ हजार मेगावॉटच्या जवळपास होती. त्यानंतर कृषीपंपासह विद्याुत यंत्राचा वापर कमी होऊन ही मागणी २७ हजार मेगावॉटपर्यंत खाली आली. परंतु, आता राज्यातील बहुतांश भागातील तापमान वाढल्यावर विजेची मागणी १३ मार्चला दुपारी २.४० वाजता ३०,३५१ मेगावॉटवर पोहचली. राज्यातील एकूण मागणीपैकी २६ हजार ६९७ मेगावॉटची मागणी ही महावितरणची आहे.

येत्या काळात तापमान वाढीसह कृषी पंपाचा वापर वाढल्यावर मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात मागणीच्या तुलनेत १८ हजार ७४० मेगावॉट विजेची निर्मिती होत होती. त्यापैकी सर्वाधिक ७,६८२ मेगावॉट वीज महानिर्मितीकडून तर जिंदलकडून ८२६ मेगावॉट, अदानीकडून ३,०३० मेगावॉट, आयडियलकडून २२९ मेगावॉट, रतन इंडियाकडून १,०७४ मेगावॉट, एसडब्ल्यूपीजीएलकडून ४६८ मेगावॉट वीज राज्याला मिळत होती. केंद्राच्या वाट्यातूनही राज्याला ११,६४१ मेगावॉट वीज मिळत होती. राज्यात विजेची मागणी वाढत असली तरी आवश्यक उपाय केल्याने सर्वत्र सुरळीत वीजपुरवठा असल्याचा महावितरणच्या जनसंपर्क विभागाचा दावा आहे.

विविध प्रकल्पातून वीजनिर्मिती

महानिर्मितीच्या नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस, परळी, चंद्रपूर, भुसावळ या सगळ्याच प्रकल्पातून बुधवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान ६,४०० मेगावॉट, उरन गॅस निर्मिती प्रकल्पातून १९७ मेगावॉट, जलविद्याुत प्रकल्पातून ९८३ मेगावॉट, सौर ऊर्जा प्रकल्पांतून ९७ मेगावॉट वीजनिर्मिती होत होती.