नागपूर : राज्यात हवामान बदलामुळे विजेच्या मागणीतही चढ-उतार दिसत आहे. बुधवारी विजेची मागणी वाढून २८ हजार ‘मेगावॅट’वर आली. एकीकडे मागणी वाढली, तर दुसरीकडे महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्पातील ६६० ‘मेगावॅट’च्या दोन संचात दुरुस्ती होऊन वीजनिर्मितीही वाढल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील बऱ्याच भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. या वातावरण बदलाचा विजेच्या मागणीवरही परिणाम होत आहे. ३ जून २०२३ रोजी दुपारी ३ वाजता राज्यात विजेची मागणी २८ हजार ‘मेगावॅट’ होती. परंतु, अवेळी पावसामुळे ५ जूनला मागणी २६ हजार ८३० ‘मेगावॅट’वर खाली आली. तापमानात घट होऊन वातानुकूलित यंत्र, कृषीपंपासह इतर विद्युत उपकरणांचा वापर कमी झाल्याने मागणी घटल्याचा महावितरणचा अंदाज होता.

हेही वाचा – लोकजागर : कोराडीतील ‘काळेबेरे’!

बुधवारी (७ जून) राज्यात विजेची मागणी दुपारी ३ वाजता पुन्हा वाढून २७ हजार ९६२ ‘मेगावॅट’वर आली. त्यापैकी राज्यात बुधवारी दुपारी ३ वाजता १६ हजार १७५ ‘मेगावॅट’ वीजनिर्मिती होत होती. तर केंद्राच्या वाट्यातूनही राज्याला १० हजार २४८ ‘मेगावॅट’ वीज मिळत होती. राज्याला मिळणाऱ्या विजेमध्ये महानिर्मितीच्या ७ हजार ६१४ ‘मेगावॅट’, अदानी ३ हजार १७७ ‘मेगावॅट’, जिंदल १ हजार १०६ ‘मेगावॅट’, रतन इंडिया ३ हजार १७७ ‘मेगावॅट’ आणि इतर कंपन्यांकडून निर्माण विजेचाही समावेश होता. या वृत्ताला महानिर्मितीच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

हेही वाचा – कुनोच्या जंगलात आणखी चित्ते सोडू नका!; नामिबियातील ‘चित्ता संवर्धन निधी’चा इशारा

वीजनिर्मितीत दुप्पट वाढ, पुरवठ्यावर परिणाम नाही

महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातील ६६० ‘मेगावॅट’च्या दोन संचात दोन-तीन दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे या संचातून वीजनिर्मिती बंद होऊन इतर यंत्रातील वीजनिर्मिती केवळ ६०० ते ७०० ‘मेगावॅट’ दरम्यान आली होती. परंतु, मंगळवारी दोन्ही संचात दुरुस्ती होऊन ते पुन्हा सुरू झाल्याने येथील वीजनिर्मिती बुधवारी १ हजार ५४१ ‘मेगावॅट’वर आली. त्यामुळे मागणी वाढूनही पुरवठ्यावर परिणाम झाला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity demand in the maharashtra is again at 28 thousand mw mnb 82 ssb