लोकसत्ता टीम
नागपूर: उपराजधानीत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे तापमानात घट झाल्याने विजेची मागणी जवळपास निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे जून महिन्याचे देयक मे महिन्याच्या तुलनेत कमी येण्याची शक्यता वीज क्षेत्रातील जाणकार वर्तवत आहेत.
उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात रोज सुमारे १६ ते १७ दशलक्ष युनिट वीज लागते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात उकाडा वाढल्याने ही मागणी तब्बल २० दशलक्ष युनिटवर गेली होती. त्यामुळे जून महिन्याचे देयक सर्वाधिक राहण्याचा अंदाज होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक पाऊस पडत आहे. त्यामुळे तापमानात मोठी घट झाल्याने घर, कार्यालय, प्रतिष्ठानातील विद्युत उपकरणांचा वापर घटला. दुसरीकडे कृषीपंपाचाही वापर कमी झाला.
आणखी वाचा-चंद्रपूर: वर्षभरात १५० वाचनालयांची निर्मिती; जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम
त्यामुळे जिल्ह्यातील मागणी घसरून १२ ते १३ दशलक्ष युनिटवर आली आहे. ही स्थिती पुढे काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने आता मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्याचे देयक कमी येण्याचा अंदाज आहे.