नागपूर : राज्य वीज नियामक आयोगाकडून मंजूर मेरिट ऑर्डर डिस्पॅचनुसार (एमओडी) सध्या राज्यात महानिर्मितीच्या खापरखेडा प्रकल्पातील एका संचातून सर्वात स्वस्त म्हणजे २.८० रु. प्रतियुनिट तर उरण प्रकल्पातील एका संचातून ७.१५ रुपये प्रतियुनिट वीज निर्मित होत आहे.

राज्यात मुंबईचा काही भाग वगळता इतर भागांत महावितरणकडून वीजपुरवठा होतो. महावितरणला वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार सर्वात स्वस्त वीज निर्मित होत असलेल्या संचातून प्राधान्याने वीज खरेदी करणे बंधनकारक आहे. या नियमानुसार सर्व वीज कंपन्यांना प्रत्येक संचनिहाय वीजनिर्मिती दर राज्य वीज नियामक आयोगाला सादर करावा लागतो. त्यानंतर हे दर आयोग मंजूर करते.

हेही वाचा – कोकणात पाऊस ओसरला, आता पावसाचा मोर्चा विदर्भाकडे…

आयोगाकडून मंजूर ‘एमओडी’नुसार वीज दरात संबंधित प्रकल्पातील कोळसा, गॅससह इंधन, ऑईल, इंधन हाताळणीच्या खर्चाचा समावेश असतो. १६ जून २०२३ ते १५ जुलै २०२३ दरम्यान मंजूर ‘एमओडी’नुसार राज्यात महानिर्मितीच्या विविध प्रकल्पांपैकी खापरखेडा प्रकल्पात सर्वात स्वस्त वीज निर्माण होते. खापरखेडा प्रकल्पातील संच क्रमांक ५ मधून सध्या २.८० रुपये प्रतियुनिट तर संच क्रमांक १ ते ४ मधून ३.३४ रुपये प्रतियुनिट वीज तयार होत आहे. कोराडी वीजनिर्मिती संच क्रमांक ८ ते १० क्रमांकातून २.९७ रुपये प्रतियुनिट तर संच क्रमांक ६ आणि ७ मधून २.९० रुपये प्रतियुनिट दराने वीजनिर्मिती होत आहे.

हेही वाचा – ‘नागपूर कलंक @9’ काय आहे? राजकीय वर्तुळात चर्चा

चंद्रपूरच्या संच क्रमांक ३ ते ७ मधून ३.५६ रुपये प्रतियुनिट तर संच क्रमांक ८ व ९ मधून ३.१२ रुपये प्रतियुनिट दराने वीजनिर्मिती होत आहे. भुसावळमधील संच क्रमांक ४ व ५ मधून ३.१२ रुपये प्रतियुनिट तर संच क्रमांक ३ मधून ४.०७ रुपये प्रतियुनिट दराने वीज निर्माण होत आहे.
परळीतील संच क्रमांक ८ मधून ५.३० रुपये प्रतियुनिट, नाशिकच्या संच क्रमांक ३ ते ५ मधून ४.०७ रुपये प्रतियुनिट, पारसच्या संच क्रमांक ३ ते ४ मधून ३.१६ रुपये प्रतियुनिट दराने वीजनिर्मिती होत आहे. तर उरणच्या गॅसवर आधारित एका संचातून सर्वात महाग म्हणजे ७.१५ रुपये तर दुसऱ्या प्रकल्पातून ५.१३ रुपये प्रतियुनिट दराने वीजनिर्मिती होत आहे. या वृत्ताला महानिर्मितीच्या अधिकाऱ्याकडून दुजोरा देण्यात आला आहे.

Story img Loader