अमरावती : परिमंडळाअंतर्गत २३१ कोटी ५२ लाख रुपयांच्या वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने मोहीम तीव्र केली असून महावितरणच्या मोहिमेत वीजबिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या परिमंडळातील ६ हजार १४६ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. एकूण थकबाकी आणि पुन:र्जोडणी शुल्क भरल्याशिवाय या ग्राहकांचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात येणार नाही. त्यामुळे महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.
परिमंडळाअंतर्गत विविध वर्गवारीतील सुमारे १५ लाख ग्राहकांना महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. तथापि जानेवारी अखेर कृषी ग्राहक, पाणीपुरवठा व पथदिव्याचे ग्राहक वगळून परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे २३१ कोटी ५२ लाख रूपये वीजबिलाचे थकल्यामुळे महावितरणपुढे आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. थकबाकीचा आकडा मोठा आहे. त्यामुळे महावितरणने महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच वीज बिल वसुली मोहिम अधिक तीव्र केली आहे.
परिमंडळाअंतर्गत २३१ कोटी ५२ लाख रूपयाच्या थकीत विजबिलामध्ये अमरावती जिल्ह्यातील ११० कोटी ७५ लाखाचा समावेश आहे. तथापि २० फेब्रुवारी पर्यंत ३८ कोटी रूपयाचा वीजबिलाचा भरणा करण्यात आला आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात १२० कोटी ७७ लाख रूपयाच्या थकबाकीपोटी २५ कोटी रूपयाचा वीज बिल भरणा करण्यात आला आहे. परंतू महिन्याच्या उरलेल्या दहा दिवसात मोठी थकबाकी वसुल करावी लागणार असल्याने महावितरणने विजबिल वसुली मोहिमेला गती दिली आहे.
वीजबिल भरण्यासाठी प्रतिसादच मिळत नसल्याने फेब्रुवारी महिन्याच्या २० दिवसात परिमंडळातील ६ हजार १४६ ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ३ हजार ८८ आणि यवतमाळ जिल्ह्यातील ३ हजार ५८ ग्राहकांचा समावेश आहे.
पुनर्जोडणी शुल्काचा आर्थिक भूर्दंड टाळा वीज ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक आहे. तथापि महावितरणची कारवाई झाल्यानंतर संबंधित ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्याची नोंद महावितरणच्या ऑनलाईन प्रणालीत करावी लागते. त्यामुळे सिंगल फेज ग्राहकांना रूपये ३१० अधिक जीएसटी आणि ३ फेज ग्राहकांना रूपये ५२० अधिक जीएसटी पुन:र्जोडणी शुल्क भरावेच लागणार त्यामुळे होणार मनस्ताप,आर्थीक दंड आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.