महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर: जी- २० अंतर्गत सी- २० परिषदेसाठी केलेल्या रोषणाईसाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरी परिसरातही वीजचोरी झाली. शहरात असे प्रकार सर्वत्र सुरू असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित करताच महावितरणने कारवाईचा धडाका लावला.
जी २० अंतर्गत विविध रस्त्यांच्या शेजारी व झाडांवर रंगबीरंगी रोषणाई केली जात आहे. हे काम शेवटच्या टप्प्यात असले तरी काही भागात तीन ते चार दिवसांपासून रोषणाही सुरू आहे. यापैकी बहुतांश वीज चोरीची असल्याचे लोकसत्ताने पुढे आणले होते. त्यानंतर महावितरणने सिव्हिल लाईन्समधील मुख्यमंत्री बंगला (रामगिरी) व ऑफिसर क्लब जवळ वीजचोरी पकडली. दरम्यान, सिव्हिल लाईन्समध्ये जीपीओ चौक, राजा राणी चौक, घटाटे बंगला, धांडलिया हाऊस परिसरातही चोरीची वीज वापरली गेली. सोमलवाडा परिसरातही एक ठिकाणी चोरीची वीज वापरण्यात आली.
आणखी वाचा- धक्कादायक..! ‘जी २०’साठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत चोरीच्या विजेने!
या सगळ्या भागातील महावितरणने काम दिलेल्या कंत्राटदारांवर वीज कायदा १३५ अन्वये कारवाई करून ५० हजार रुपये दंड आकारण्यात आला. सोबत येथील वीज वितरण पेटीत अनधिकृत जोडलेल्या वीज ताराही जप्त करण्यात आल्या. महापालिकेकडून आलेल्या मागणीनंतर महावितरणने १२ ठिकाणी तात्पुरती वीज जोडणी दिली होती. लोकसत्ताच्या वृत्तानंतर शनिवारी आणखी ९ ठिकाणांसाठी अर्ज दिले गेले.
कारवाईचा इशारा
जी २० साठी झालेल्या वीज चोरी प्रकरणाचा उलगडा झाल्यावर महावितरणने नागपूर महापालिकेला तातडीने आवश्यक तेथे तात्पुरते वीज मीटर घेण्याचे पत्र दिले आहे. अधिकृत जोडणी न घेतल्यास कारवाईचा इशाराही दिला गेला आहे.