गडचिरोली : मागील आठवडाभरापासून तापमान वाढण्यास सुरुवात झाल्याने उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. याची झळ केवळ मनुष्यालाच नव्हे तर प्राण्यांदेखील बसू लागली आहे. अशात गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर हत्तीकॅम्पमधील ‘रुपा’ हत्तीण पाणी पिण्यासाठी चक्क हापशीवर आल्याची चित्रफीत सार्वत्रिक झाली आहे.
राज्यातील एकमेव हत्तीकॅम्प गडचिरोली जिल्ह्यातील कामलापूर येथे आहे. वर्षभरापूर्वी येथील हत्ती अंबानींच्या जामनगर (गुजरात) येथील प्राणिसंग्रहालयात हलविण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तेव्हापासून हे कॅम्प राज्यभरात चर्चेत आले होते. गेल्या सहा दशकांपासून स्थित या हत्तीकॅम्पमध्ये एकूण आठ हत्ती आहेत. यातील रुपा हत्तीण आपली तहान भागवण्यासाठी चक्क हापसीवर आल्याचा व्हिडीओ सर्वत्र ‘व्हायरल’ झाला आहे. यात रुपा पाण्यासाठी हापसीजवळ उभी असून तेथील कर्मचारी हापासून तिला पाणी पाजत असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर तहान भागवल्यानंतर शिल्लक पाणी रुपाने सोंडेने अंगावर शिंपडले.
हेही वाचा – खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी; पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून…
दोन वर्षांपूर्वी रुपा स्वतः सोंडेने हापसून पाणी पीत असल्याचा व्हिडीओ सार्वत्रिक झाला होता. आता पुन्हा एकदा तसाच प्रसंग एका पर्यटकाने आपल्या मोबाईलमध्ये टिपल्याने या चित्रफितीची सर्वत्र चर्चा आहे.