मुख्य वन्यजीव रक्षकांच्या अध्यक्षतेत समिती

भारतातील अनेक राज्यात जंगली हत्ती नसले तरी बंदिवान हत्तींची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. यातील अनेकांकडे हत्तींचे मालकी प्रमाणपत्र नाही. नैसर्गिक वास्तव्यापासून दूर ठेवत या हत्तींना अनैसर्गिक पद्धतीने जीवन जगण्यास भाग पाडले जाते. परंतु एका वन्यजीवप्रेमीमुळे हा विषय ऐरणीवर आला असून तब्बल चार वर्षांनंतर का होईना, या हत्तींना न्याय मिळाला आहे. भारतातील बंदिवान हत्तींची गणना केली जाणार आहे. त्यासाठी  मुख्य वन्यजीव रक्षकांच्या अध्यक्षतेत समितीची स्थापना केली जाणार आहे.

कर्नाटकातील वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्राच्या (डब्ल्यूआरआरसी-वाईल्डलाईफ रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर) सुपर्णा गांगुली यांनी यासंदर्भात न्यायालयात धाव घेतली होती. कर्नाटकातील म्हैसूर येथील एका मंदिरात हत्तीला बेकायदेशीररित्या ठेवण्यात आले होते. त्याचे कायदेशीर प्रमाणपत्र मंदिर व्यवस्थापनाकडे नव्हते आणि त्याची योग्य ती काळजी देखील घेतली जात नव्हती, असा अहवाल कर्नाटक वनखात्यातील पशुवैद्यक डॉ. प्रयाग यांनी खात्याला सोपवला होता. या अहवालावरून सुपर्णा गांगुली यांनी न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने नुकताच निर्णय जाहीर केला आहे. मुख्य वन्यजीव रक्षकांच्या अध्यक्षतेत तज्ज्ञांची एक समिती नेमली जाणार असून समितीतील तज्ज्ञ भारतातील सर्व राज्यात फिरून पाहणी करतील. ज्या व्यक्ती वा संस्थांकडे हत्ती आहे, त्यांच्याकडे मालकी प्रमाणपत्र आहे किंवा नाही तसेच कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जाते किंवा नाही याची पाहणी केली जाईल. मुख्य वन्यजीव रक्षक हा अहवाल केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल खात्याच्या सुपूर्द करतील. जानेवारी २०१९च्या दुसऱ्या आठवडय़ाच्या आत खात्याला न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवडय़ात बेकायदेशीररित्या बंदिस्त केलेल्या हत्तींच्या प्रकरणांची यादी जाहीर केली जाणार असून त्यावर कारवाई केली जाणार आहे. भारतातील सर्वच राज्यात ही गणना आणि सर्वेक्षण होणार असून वनखात्याच्या अखत्यारितील हत्तींचा देखील यात समावेश असणार आहे.

मंदिरातील हत्तींचा सर्वाधिक छळ

भारतात बंदिवान हत्तींची संख्या ३६००च्या आसपास आहे. आशियातील एकूण बंदिवान हत्तींपैकी २० टक्के हत्ती भारतात आहेत. मंदिरातील हत्तींना सन्मान दिला जात असला तरीही सर्वाधिक छळ त्यांचाच होत असल्याचे एएनसीएफ, सीयूपीए आणि डब्ल्यूआरआरसीच्या एका अभ्यासात म्हटले आहे.

शिफारशींना वाटाण्याच्या अक्षता

हत्तीचा जन्म झाल्याबरोबर त्याचे एक पासबुक तयार केले जावे. त्यात हत्तीचे पालक, जन्मस्थळ आदी सर्व नोंदी असाव्यात. या हत्तींची मालकी, त्यांच्या प्रवासाच्या नोंदी पासबुकमध्ये असाव्यात. ज्यांच्याकडे हत्ती असतो, त्यांना मुख्य वन्यजीव रक्षकांकडून मालकी प्रमाणपत्र दिले जावे आणि दरवर्षी पाहणीनंतर त्याचे नूतनीकरण केले जावे, आदी शिफारशी हत्ती कृती दलाने केलेल्या आहेत. मात्र, त्याचे कुठेही पालन होताना दिसून येत नाही.