गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी शेतशिवारात गडचिरोली जिल्ह्यातून दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपाने मंगळवारी रात्री चांगलाच धुडगूस घातला. या हत्तींनी धान पिकासह शेतकरी पुरणलाल बेलखोडे, भोजराज बेलखोडे यांच्या पॅक हाऊसची पूर्णतः नासधूस केली.

१२ डिसेबर रोजी २० ते २५ च्या संख्येत असलेला हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथून नागनडोहमार्गे अर्जुनी मोरगाव तालुक्यात दाखल झाला होता. त्याच रात्री राजोली, भरनोली येथील नीलकंठ हरमी यांच्या शेतातील पाच एकरांतील धानाच्या पुजण्याची नासधूस करून हत्तीचा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यात परतला. मात्र, १२ डिसेंबरच्या रात्री पावणेबारा-बाराच्या सुमारास हत्तींनी पुन्हा बाराभाटी शेतशिवारात पुनरागमन केले. शेतकरी पुरणलाल बेलखोडे, भोजराज बेलखोडे यांचे पॅक हाऊस व गांडूळ खत असलेल्या इमारतीची व इमारतीमध्ये ठेवलेल्या ३०० पोती धानाची हत्तींनी नासधूस केली. तसेच गौरव दादाजी बेलखोडे यांच्या शेतात असलेल्या पोल्ट्री फार्मची नासधूस करीत १९ धानाची पोती उ‌द्ध्वस्त केली. केळी, नारळाची झाडे, पोपट, हळद, मिरची, तूर व उन्हाळी पऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.

हेही वाचा – भंडारा : धान कापणीसाठी मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले; १८ जखमी, ३ गंभीर

हेही वाचा – साहित्यिक, व्यंगचित्रकार, कवी आणि कुशल रंगमंच निवेदक मधुप पांडे यांचे निधन

शेतकऱ्यांनी रात्री शेतात जाऊ नये

अर्जुनी मोरगाव तालुक्यात पुन्हा एकदा रानटी हत्तींच्या कळपाचे आगमन झाले असून, नागरिकांनी सजग राहावे. शेतकऱ्यांनी रात्रीला शेतात जाऊ नये, खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे. बाराभाटी शेतशिवारातून हत्तींचा कळप कवठा, बोळदे, कालीमाटी परिसरातील जंगलाकडे गेला असल्याची माहितीही वनविभागाने दिली. घटनेची माहिती मिळताच राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी बाराभाटी येथे शेतशिवारात जाऊन नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली.

Story img Loader