नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या कंत्राटी प्राध्यापक भरतीमध्ये पात्रताधारकांना डावलून मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉ. राहुल हळदे हे नेट, पीएच.डी. उत्तीर्ण असून त्यांना वीस वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. असे असतानाही विद्यापीठाच्या फाईन आर्ट विभागामध्ये त्यांना डावलून तुलनेने कमी शिकलेल्यांची नियुक्ती करण्यात आल्याची तक्रार डॉ. हळदे यांनी कुलगुरूंकडे केली आहे. आपल्या मनमानी कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापकांच्या नियुक्त्या करताना घोळ केल्याचा आरोप महाराष्ट्र प्राध्यापक सेनेने याआधीही केला होता.

विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील विविध शैक्षणिक विभागात मोठ्या प्रमाणात सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठाने जुलै महिन्यात विविध शैक्षणिक विभागातील अध्यापन कार्य सुरळीत व्हावे म्हणून जवळपास कंत्राटी प्राध्यापकांची १२८ पदे भरण्यासाठी जाहिरात काढली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात अनेक उच्च गुणवत्ता धारक उमेदवारांना डावलून आपल्या लोकांचा भरणा करण्यावर विद्यापीठाने विशेष भर दिला, असा आरोप आहे.
निवड झालेल्यांना जवळपास ५ व ६ सप्टेंबरला म्हणजे एका महिन्यानंतर नियुक्ती पत्रे देण्यात आली.

हेही वाचा : पतीकडे परतलेल्या प्रेयसीला गाडीने चिरडण्याचा प्रयत्न; प्रियकराला अटक

मात्र प्रशासनाने या भरती प्रक्रियेची निवड यादी जाहीर करणे टाळले. निवड यादी जाहीर न करता विद्यापीठाने आपला खोटेपणा लवपल्याचा आरोप होत आहे. डॉ. हळदे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, फाईन आर्ट विभागातील प्राध्यापक पदासाठी त्यांनी अर्ज केला होता. डॉ. हळदे हे पीएच.डी. नेट उत्तीर्ण आहेत. मुलाखतीवेळी त्यांच्याइतके एकही पात्रताधारक नव्हते. मुलाखतीत विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. असे असतानाही त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप डॉ. हळदे यांनी केला. त्यामुळे विद्यापीठाच्या कंत्राटी प्राध्यापक भरतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

Story img Loader