अकोला : जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पाऊस दडी मारून बसला आहे. त्याचा परिणाम विजेच्या उत्पादनावरदेखील झाला. विजेचे घटलेले उत्पादन व वाढलेल्या मागणीचे ताळमेळ साधण्यात महावितरणची कसरत होत आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र सर्वाधिक वीजहानी होणाऱ्या फीडर्सवर महाविरतणने आपत्कालीन भारनियमन सुरू केले. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना भारनियमानाचे चटके बसत आहेत.
राज्यात यंदा अनियमित स्वरुपाचा पाऊस होत आहे. मोसमी पावसाचे उशिराने आगमन झाले. त्यातच पुन्हा ऑगस्ट महिना कोरड्यात गेला. कृषीसह याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम होत आहेत. पावसाअभावी औष्णिक विद्युत प्रकल्पातील वीजनिर्मितीमध्ये घट झाली. पावसाळ्यात ऐरवी विजेच्या मागणीत घट होत असल्याने काही वीजनिर्मिती संच देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येतात. त्यानुसार कोराडी व इतर ठिकाणच्या काही संचातून वीजनिर्मिती बंद आहे. गत काही दिवसांपासून पाऊस पडत नसल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी पाणी देत आहे. त्यामुळे कृषिपंपांचा वापर सुरू झाला, तापमान वाढीमुळे घरगुती वीज वापरही वाढला आहे. परिणामी, संपूर्ण राज्यात विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली.
विजेच्या मागणी आणि पुरवठ्यात सुमारे दीड ते दोन हजार मेगावॉटची तूट निर्माण झाली. ही तूट भरून काढण्यासाठी जी १, जी २ व जी ३ फीडर्सवर आपत्कालीन भारनियमन सुरू झाले आहे. विजेची उपलब्धता आणि मागणीनुसार भारनियमनाचा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती महावितरणच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.
वाणिज्यिक हानी अन् भारनियमन
महावितरणच्या अकोला परिमंडळात गेल्या दोन आठवड्यांपासून आपत्कालीन भारनियमनाला सुरुवात झाली. विजेची वाणिज्यिक हानी जास्त असलेल्या भागात हे भारनियमन केले जात आहे. वीज चोरीचे प्रमाण जास्त असणाऱ्या भागात सध्या भारनियमनाचे चटके बसत आहेत. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
हेही वाचा – ताडोबात जंगल सफारीसाठी नवीन संकेतस्थळाची चाचपणी सुरू
वीज हानीनुसार ठरले ‘फीडर्स’
महावितरणने वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार विद्युत वाहिन्यांचे वर्गीकरण केले आहे. वितरण व वाणिज्यिक हानी प्रमाणात फीडर्स निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये ए ते जी-३ पर्यंतच्या फीडर्सचा समावेश आहे. ५० टक्क्यांवर वीजहानी असलेले फीडर्स जी-१ मध्ये मोडतात, तर ५५ टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी होणारे फीडर्स जी-२ मध्ये व ६५ टक्क्यांपर्यंत वीज हानीच्या फीडर्सचा समावेश जी-३ मध्ये आहे. सध्या याच तीन फीडर्समध्ये भारनियमन करण्यात येत आहे.