वाडेगावकर, शेष यांनी जागवल्या आठवणी
नागपूर : ‘या जन्मावर या जगण्यावर ’, ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे ’, ‘भातुकलीच्या खेळामधली ’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’ यासारख्या अनेक अजरामर गीतांना ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांनी नागपुरात चाली बांधल्या. त्यांच्या जाण्याने गीतांच्या सृजन प्रवासाचा पट नव्याने डोळ्यासमोर तरळून गेला, अशा शब्दात येथील ज्येष्ठ तबलावादक गोपाळराव वाडेगावकर आणि ज्यांच्या निवासस्थानी राहत होते, त्या श्रीमती शेष यांनी आठवणींना उजाळा दिला.
ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांचा बहुतांश काळ मुंबईत गेला असला तरी नागपूरशी त्यांचे वेगळे नाते होते. यशवंत देव हे नागपूर आकाशवाणीत कार्यरत असताना रामदासपेठमध्ये शेष यांच्या निवासस्थानी आठ वर्षे वास्तव्यास होते. देव यांच्या आठवणींना उजाळा देताना श्रीमती माणिक शेष यांनी सांगितले, नागपूर आकाशवाणीत रुजू झाल्यानंतर त्यांना राहायला जागा हवी होती. कोणीतरी त्यांना रामदासपेठला शेष यांच्या घरी एक खोली असल्याचे सांगितले. ते फिरत फिरत घरी आले. त्यावेळी ते कोण आहेत हे माहिती नव्हते. त्यांनी घर खाली आहे का विचारले. त्यांच्याकडून महिन्याला शंभर रुपये भाडे घेऊन त्यांना राहायला जागा दिली. येथे राहायला आल्यावर आमच्या घरातीलच एक सदस्य झाले. एक ज्येष्ठ संगीतकार असले तरी सामान्य व्यक्तीसारखेच राहत होते. अनेक मोठी माणसे त्यांच्या भेटीला येत होती. त्यांनी अनेक प्रसिद्ध गीते लिहून नागपुरातच चाली दिल्या. ती गीते अजरामर झाली. त्यांच्याकडे वाहन नव्हते. त्यामुळे रामदासपेठमधून ते आकाशवाणीला पायी जात होते. सायंकाळी घरी आल्यावर त्यांच्याकडे आलेल्यांना गाणे शिकवत होते. रात्री आम्ही सर्व एकत्र जेवायला बसायचो. ते जेवण करताना गीत ऐकवत होते. एखाद्या गीताला त्यांनी चाल दिली की मला आधी ऐकवायचे. ते मनमिळावू स्वभावाचे होते. सतत गप्पा मारायचे. नंतर ते नागपूर सोडून मुंबईला गेले, परंतु नागपूरला आले की घरी उतरत होते. त्यांना दुसरीकडे कुठेही थांबायला आवडत नव्हते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
नागपूर आकाशवाणीत यशवंत देव यांचा सहवास लाभलेले पं. गोपाळराव वाडेगावकर म्हणाले, आम्ही दोघे मुंबईला असताना त्यांची नागपूर आकाशवाणीला बदली झाली आणि त्यानंतर काही दिवसात मीही नागपूरला आलो. एखादी चाल कशी बांधावी, यामध्ये त्यांचा हातखंडा होता. तालाच्या बाबतीत स्टुडिओमध्ये ते चर्चा करीत होते. त्या काळात अनेक नवोदित कलावंत आकाशवाणीत गाणी सादर करण्यास येत. देव त्यांना मार्गदर्शन करीत होते. स्वत: चाली स्वरबद्ध करून देत होते. त्यांच्या एका कार्यक्रमात तबल्याची साथसंगत केली होती. सुगमसंगीतामध्ये यशवंत देव हे खऱ्या अर्थाने बाप होते. स्टुडिओमध्ये त्यांच्यासोबत खूप गप्पा रंगायच्या, असेही गोपाळराव म्हणाले.
स्वरमालाने केला सत्कार
ज्येष्ठ संगीतकार आणि गायक यशवंत देव यांच्या पंचाहत्तरीनिमित्त नागपूरला त्यांचा सत्कार व्हावा, अशी नागपुरातील स्वरमाला या संस्थेच्या कलावंताची इच्छा होती. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी होकार दिला. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात स्वरमाला संस्थेच्या कलावंतांनी त्यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर केला. त्यावेळी राम शेवाळकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.