लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : सार्वजनिक गणेशोत्सवांसह घरोघरी विराजमान विघ्नहर्ता गणपती बाप्पाला गुरुवारी अनंत चतुर्दशीला वाजत-गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला. अकोल्यातील पारंपरिक विसर्जन मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेक गणेशोत्सव मंडळांसह आखाड्यांनी सहभाग घेतला. गणेश विसर्जनासाठी गणेशभक्तांसह महापालिका, महसूल व पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवल्याने गणेश विसर्जन शांततेत सुरू आहे.

गणेश विसर्जन मिरवणूक हा अकोल्याचा एक सांस्कृतिक ठेवा बनला आहे. शतकोत्तर परंपरा आजही अबाधित आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी १० वाजता जयहिंद चौक येथून प्रारंभ झाला. यावेळी मानाच्या श्री बाराभाई गणपतीचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांनी पूजन केले. श्री बाराभाई गणपती मंडळातर्फे प्रसादाचे वितरण करण्यात आले. श्री बाराभाई गणपतीच्या पाठोपाठ मिरवणुकीमध्ये मानाचे राजेश्वर गणपती, जागेश्वर गणपती व खोलेश्वर गणपती सहभागी होते. त्यानंतर आलेले गणेशोत्सव मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले. जयहिंद चौकातून निघालेली मिरवणूक अगरवेस, दगडी पूल, मामा बेकरी, उदय टॉकीज, मानेक टॉकीज, अशोक स्टँड, सुभाष चौक, तेलीपुरा चौक, ताजनापेठ पोलीस चौकी, किराणा बाजार, सराफा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, गांधी रोड, शहर कोतवाली मार्गे विसर्जन मिरवणूक गणेश घाटावर पोहोचली. यावर्षी मिरवणुकीत अनेक गणेश मंडळे व आखाड्यांचा सहभाग घेतला. विविध आखाड्यांनी चित्तधरारक प्रात्याक्षिके सादर करून लक्ष वेधून घेतले. सुभाष चौक येथे गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत करून रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

आणखी वाचा-‘पुढच्या वर्षी लवकर या’चे साकडे घालत गणरायाला भावपूर्ण निरोप; कृत्रिम तलावाला नागपुराकरांचा प्रतिसाद

याशिवायही ठिकठिकाणी मिरवणुकीत अनेक संघटनांनी चहा, नास्ता व महाप्रसादाचे वितरण केले. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबतच घरामध्ये आस्थेने बसविण्यात आलेल्या गणेशाला निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गणेश घाटावर गणेश भक्तांनी गर्दी केली. शहरात अनेक ठिकाणी कृत्रिम घाटाची व्यवस्था करण्यात आली होती. कुटूंबासह याठिकाणी आराधना करीत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. पारंपरिक वाद्यावर गणेशभक्त ठेका धरत होते. गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional farewell to ganpati bappa excitement of traditional immersion procession in akola ppd 88 mrj