लोकसत्ता टीम
अकोला : जुनी सेवानिवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून त्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. विविध मागण्यांसाठी सोमवारी घंटानाद आंदोलनासह काळ्याफिती लावून निषेध नोंदवण्यात आला. संघटनेने विविध मागण्यांसंदर्भात प्रशासन व शासनाला निवेदन दिले आहे.
१ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्तिवेतन योजना लागू न करता नवीन अंशदायी योजना लागू केली. ती रद्द करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपचे हत्यार उपसले. त्यानंतर शासनाने समिती गठित करून मुद्दा निकाली काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यावर हालचाली झाल्या नसल्याने कर्मचारी संघटनेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली.
जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यासह गत चौथ्या, पाचव्या वेतन आयोगातील तफावत दूर करून कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्यात यावी, पदोन्नतीस्तर कमी करून दोन टप्प्यानंतर तिसऱ्या टप्प्यावर वर्ग दोनमध्ये पदोन्नती देण्यात यावी, महाराष्ट्र विकास सेवा श्रेणी वर्ग दोनच्या नियमात सुधारणा करण्यात यावी, जिल्हा परिषद कर्मचारी आकृतीबंधामध्ये कामाचा वाढलेला व्याप लक्षात घेता सुधारणा करण्यात यावी, जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ च्या नियमात बदल करण्यात यावेत, परिचर व वाहन चालक या पदांवर भरती बंदचा आदेश शासनाने रद्द करावा व या ठिकाणी अनुकंपा तत्वावर नेमणुकीसाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना प्राधान्याने नेमणुका द्याव्यात, जि.प.मध्ये काम करणाऱ्या परिचर व वाहन चालक या दोन्ही संवर्गातील कर्मचाऱ्यांना नियमानुसार गणवेशासाठी रोख रक्कम व धुलाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मंजूर करण्यात याव्या आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले होते.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्याचे जि.प. कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव सुनील जानोरकर यांनी सांगितले. मात्र, अद्यापही मागण्या मंजूर झालेल्या नाहीत. त्यामुळे आता आंदोलन सुरु केले आहे. पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून व घंटानाद आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन टप्प्याटप्याने तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. आंदोलनात गिरीश मोगरे, राजेश मालगे, गजानन उघडे, अंकुश पटेल, विनोद बढे, संतोष ताथोड, दिनेश काटे, अभिजित बन्नोरे, संजय उंबरकर, रामधन सावदेकर, कैलास मसने आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.