महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : ‘एसटी’ने बऱ्याच वर्षांपासून चालक-वाहकांना गणवेश दिला नसताना आता महामंडळ गणवेश नसलेल्यांवर कारवाई करणार आहे. याशिवाय चालक- वाहकांची नियमित मद्य तपासणीही होणार आहे. त्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप असून आम्हाला मद्यपी समजता का, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे.
हेही वाचा >>> नागपूर : ‘सत्ता हातातून निसटत असल्याचे दिसू लागले की गोमूत्र, गाय, सावरकर आठवतात’; महाविकास आघाडीचे नेते आक्रमक
एसटी महामंडळाने २७ मार्च २०२३ रोजी सगळ्या विभाग नियंत्रकांना आदेश देऊन सर्व चालक- वाहकांची नियमित गणवेश व मद्य तपासणीचे आदेश काढले. परंतु, एसटीकडून गेल्या तीन वर्षांपासून चालक-वाहकांना गणवेशासाठी कापड व शिलाईचे पैसे मिळाले नाही. उलट आता गणवेश सक्तीचे आदेश काढण्यात आले. आदेशात रोज चालक-वाहकांची पूर्ण गणवेशात (स्वच्छ गणवेश, नेमप्लेट, बॅच, लायसन्स इ.) असल्याबाबत तपासणी होईल. गणवेश नसलेल्यांवर कारवाईचे आदेश आहेत. सोबत प्रत्येक चालक-वाहकाला कामगिरी सोपवण्यापूर्वी त्यांची मद्य तपासणीही केली जाईल.
चिकू खाल्ल्यावरही मद्याचे संकेत
कर्मचाऱ्यांसाठी गणवेशाची मागणी केल्यावरही ते मिळत नाही. सध्या निवडक आगारात मद्य तपासणी करणारे यंत्र आहे. काही नादुरुस्त यंत्रात चिकू खाल्ल्यावरही मद्य पिल्याचे संकेत दिले जातात. त्यामुळे महामंडळाने आवश्यक सुधारणा केल्यावरच याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे.
– संदीप शिंदे, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कमगार संघटना.
कर्मचाऱ्यांनी मद्य प्राशन करून सेवा देण्याला आमचा विरोधच आहे. परंतु, ही प्रक्रिया प्रवाशांपुढे झाली तर कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलीन होईल.
– मुकेश तिगोटे, राज्य महासचिव, राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक).