बुलढाणा : होय! आठवडाभर चाललेल्या अभूतपूर्व संपानंतर आज कार्यालयात परतलेल्या कर्मचाऱ्यांची हीच प्रतिक्रिया आहे. विविध संघटनाच्या ऐक्याचे शक्तिप्रदर्शन ठरलेल्या संपाच्या युद्धात आम्ही जिंकलो, पण चर्चारूपी तहात आम्ही पराभूत झालो, अशीच भावना बहुतेक कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविली.
मागील आठवड्यापासून शुकशुकाट असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय, सहा उपविभागीय कार्यालये आणि १३ तहसील कार्यालयातील हजारो कर्मचारी आजपासून कामावर रुजू झाले आहे. याशिवाय इतर कर्मचारीसुद्धा नाईलाजाने का होईना कामावर परतले. मात्र, त्यांची देहबोली निरुत्साही होती आणि बहुतेकांच्या प्रतिक्रिया संतप्त आहेत. जुनी पेन्शनच्या मागणीबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसताना नेत्यांचा माघारीचा निर्णय बहुतांश कर्मचाऱ्यांना रुचलेला दिसत नाही.
‘हा तर दुर्दैवी दिवस’
मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर राज्य समन्वय समितीचे समन्वयक विश्वास काटकर यांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, राजस्तरीय घडामोडींमुळे जुनी पेन्शन न मिळताच संप मागे घ्यावा लागला. आजचा दिवस आमच्यासाठी दुर्देवी दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी न भूतो न भविष्यती प्रतिसादबद्धल कर्मचाऱ्यांचे आभार मानले असून झालेल्या मनःस्तापाबद्दल क्षमायाचना केली आहे. भविष्यात याच मागणीसाठी पुन्हा मैदानात उतरू, असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला आहे हे पत्रक बुलढाण्यासह सर्वत्र वितरित करण्यात आले. जिल्हा समन्वयक किशोर हटकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना याच शब्दात आपल्या भावना व प्रतिक्रिया व्यक्त केल्या.