बुलढाणा : औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या आणि कृषीप्रधान बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोजगाराची तीव्रता वाढली आहे. परिणामी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांकडे मजुरांचा ओढा वाढला आहे. जानेवारी महिन्यातच जिल्ह्यातील ‘मनरेगा’च्या कामांवर जवळपास १५ हजार मजूर कार्यरत असल्याने ही बाब अधोरेखित झाली आहे.
जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत १४०० गावे व ८८९ ग्रामपंचायती आहेत. यामुळे १३ तालुके (नगरी भाग)वगळता ग्रामीण भागाची व्याप्ती मोठी आहे. कृषी प्रधान बुलढाणा जिल्ह्यातील खरीप पिकांखालील क्षेत्र साडेसात लाख, तर रब्बी पिकांखालील क्षेत्र सव्वालाखाच्या आसपास आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतीची कामे हाच रोजगार आहे. खरीप हंगामात शेतीची कामे जास्त राहतात. त्यातुलनेत रब्बी हंगामात मजुरीची कामे कमी असतात. आता रब्बीची कामे कमी झाल्याने ग्रामीण मजुरांचा कल रोजगार हमी योजनेच्या कामांकडे वाढला आहे.
हेही वाचा >>>बुलढाणा : केवळ ४० हजारांसाठी दरोडेखोरांनी जीव घेतला, घरी सीसीटीव्ही यंत्रणा आणली, पण…
यंदाच्या वर्षी यात कैकपटीने वाढ झाली असल्याचे आढळून आले. एरवी जानेवारी महिन्यात ‘मनरेगा’च्या कामावरील मजुरांची संख्या सात ते नऊ हजारांच्यादरम्यान राहते. मात्र आजमितीला १३ तालुक्यातील २६०२ कामांवर १४,८६३ मजूर कामांवर असल्याचे चित्र आहे. यामुळे हजारो मजुरांना गावालगत रोजगार मिळाला आहे. शेतीची कामे कमी असल्याने जास्त संख्येने मजूर ‘रोहयो’कडे वळले आहेत. पाचशे ग्रामपंचायत क्षेत्रात ही कामे सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने घरकुलांच्या कामांची संख्या जास्त आहे. याशिवाय सिंचन विहीर, फळबाग लागवड, वृक्षारोपण, पांदण रस्त्यांची कामेही सुरू आहेत. संग्रामपूर, सिंदखेडराजा, चिखली, खामगाव, बुलढाणा, मेहकर या तालुक्यांतील कामे आणि मजूरसंख्या जास्त आहे.