वर्धा : गांधी जिल्हा ही जगभर दर्शनी ओळख असलेला वर्धा जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर राहिलेला आहे. कृषिप्रधान व्यवसाय हा जिल्ह्याच्या उत्पन्नाचा प्रमुख स्राोत आहे. स्थूल उत्पन्न ३३ हजार २६९ कोटी रुपये आहे. निव्वळ जिल्हा उत्पन्न २९,३३८ कोटी रुपये असून जिल्हा दरडोई उत्पन्नाचे प्रमाण राज्य उत्पन्नाच्या ०.९२ टक्के आहे.

अलीकडच्या काळात महिला बचत गटाच्या विक्रमी उलाढालीने जिल्हा राज्यात अव्वल ठरला. नावीन्यपूर्ण उपक्रमाने गाजला. राज्यातील पहिला सोलर प्रकल्प देवळीत उभा झाला. या ठिकाणी सोलर पॅनल, पथदिवे, गृहोपयोगी बल्बची निर्मिती होत आहे. त्यामुळे बाजारातील इतर सौर उत्पादनापेक्षा येथील उत्पादने तुलनेने माफक दरात उपलब्ध होतात. या गटांचे व्यवहार ऑनलाइन पद्धतीने सुलभ करण्यासाठी ई- शक्ती हे अॅप तयार करण्यात आले. परिणामी गरजेनुसार तात्काळ कर्ज प्राप्त होते. आवश्यक ते मार्गदर्शन तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सूरू झाल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्यात.

कौशल्य विकास केंद्र, राज्यात अव्वल

वर्धा जिल्ह्यात गत चार वर्षात स्थापन झालेल्या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळाल्याची आकडेवारी आहे. या विविध केंद्रातून २०२० – २१ या एकच वर्षात ७८ हजार ४५४ उमेदवारांची नोंदणी झाली. विशेष प्रशिक्षण ५ हजार १८७ युवकांनी घेतले. त्यापैकी ४ हजार १३५ युवकांनी स्वयंरोजगार सुरू केला, तर १ हजार ५२ युवकांना अन्यत्र रोजगार मिळाला. ही कौशल्य विकास केंद्राची कामगिरी राज्यात अव्वल ठरत आहे.

२०२२- २३ या वर्षात उपलब्ध जागांची संख्या ९ हजारांवरून २९ हजार ७७१वर पोहचली. २०२३ – २४ मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्यांची नोंदणी ९५ हजारावर पोहचली. यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ईला हायरिंग टेक्नॉलॉजीचे अंकित प्रवीण हिवरे म्हणतात, अशी केंद्रे सक्षम व्हावी म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हेतुपुरस्सर प्रयत्न केलेत. जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी माहिती तंत्रज्ञानपूरक प्रशिक्षण देण्याचा अभाव होता. आमच्या केंद्राने ती जबाबदारी घेत असतानाच आज परवलीची बाब ठरलेले कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान अमलात आणले. विदर्भात या तंत्रज्ञानाने परिपूर्ण झालेल्या १२० उमेदवारांना मोठ्या शहरात रोजगार मिळाला. ई-कामकाज ही जिल्ह्याची ओळख ठरली आहे, असे अंकित हिवरे आवर्जून नमूद करतात.

कृषिपूरक व्यवसायात अग्रेसर

वर्धा जिल्हा कृषिपूरक व्यवसायात अग्रेसर आहे. जगात सर्वोच्च पाचपैकी एक असलेली वायगावी हळद मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. या हळदीत औषधी गुणधर्म सर्वोत्तम म्हणून देशभरातून मागणी होते.

जिल्ह्याच्या उत्पन्नाचा नवा स्राोत

या जिल्ह्याची खरी ओळख जपण्यासाठी सेवाग्राम विकास आराखडा हा प्रकल्प उभा झाला. महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे जिल्ह्यास जागतिक ओळख लाभली. या आराखड्यात वर्धा – सेवाग्राम – पवनार या त्रिकोणात मोठमोठी कामे पार पडली. जगातील सर्वात उंच चरखा, संशोधन केंद्र व ग्रंथालय, हेरिटेज ट्रेल, निवास व्यवस्था, भव्य धाम नदीघाट व सौंदर्यकरणाची विविध कामे यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला. जिल्ह्याच्या उत्पन्नाचा एक नवा स्राोत या सेवाग्राम विकास आराखड्याने निर्माण झाला आहे.

कोशल्य विकास उपक्रमात जिल्हा अग्रेसर आहे, पुढेही तो राहणार. आम्ही सर्व ते प्रयत्न करणार, नव्या संधी शोधणार.- वानमाथी सी़ , जिल्हाधिकारी, वर्धा