नागपूर : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे मंगळवारी निधन झाले. त्यानिमित्ताने टाटा उद्योग समूह आणि त्याची व्याप्ती यासंदर्भात पुन्हा एकदा उजळणी सुरू झाली. जे. आर.डी. टाटा ते रतन टाटा यांचा उद्योग समृहातील प्रवास व या क्षेताली योगदानाची माहिती घेण्यात आली असता टाटा उद्योग समुहाच्या उद्योग उभारणीच्या प्रवासाचा संबध नागपूरशी जुळलेला असल्याचे निदर्शनास आले. कधी काळी नागपूरचे वैभव म्हणून ओळखली जाणारीआणि नंतर कामगारांच्या वादामुळे बंद पडलेली नागपूरची एम्प्रेस मिल ही टाटांनी सुरू केली होती.

नागपूर पूर्वी सीपीॲण्ड बेरार म्हणजे काही महाराष्ट्राचा आणि काही मध्यप्रदेश प्रांताचा भाग असलेला प्रदेश. या प्रदेशाची राजधानी म्हणून नागपूरची ओळख होती. या भागात मोठ्या प्रमाणात कापूस पिकत होता. कापसापासून कापडापर्यंत ही संकल्पना टाटा समुहाला सुचली व त्यातून १८७७ एम्प्रेस मिल्सचा नागपूरमध्ये जन्म झाला. त्यात स्पिनिंग विणकाम, आणि रंगाईचे कारखाने, १०० लूम आणि ७५,000 स्पिंडल्स वापरले जात होते.त्यात ४३०० कामगार काम करीत असे. त्यांचे भांडवल ४७ लाख होते. १९०४ मध्ये त्यांचे सूत आणि कापडाचे उत्पादन ६१ लाख इतके होते.

हे ही वाचा…गरिबांपासून मध्यमवर्गीयांपर्यत सर्वांची धावाधाव,’ पेट्यां’मध्ये दडलंय काय?

नागपूरची निवड होण्यासाठी हे ठरले कारण

जमशेदजी नसरवानजी टाटा हे कल्पक उद्योगपती होते. मध्य प्रांतातील कापसामुळे या भागात कापड गिरणी सुरू करण्याचे त्यांनी ठरविले. ते वर्ष होते, १८७४. तेव्हा जागेचा तर काही प्रश्न नव्हता. मुबलक पाणी तेवढे हवे होते. तुडुंब भरून वाहणाऱ्या नर्मदेच्या काठी हा प्रयोग यशस्वी होईल, असे त्यांच्या मनाला वाटले. त्या पाण्यापासून विद्युत शक्ती निर्माण करायची आणि त्यावर गिरणी चालवायची असे त्यांच्या मनात होते. नेमके झाले काय याची माहिती ‘आधुनिक नागपूर’मध्ये रंजकपणे दिली आहे.टाटांनी जबलपूरची जागा निश्चित केली. त्या परिसरात काही घरे होती, ती हटविण्यात टाटांना यश आले. त्याच परिसरात एका फकिराचा दर्गा होता. त्यांनी दुसरीकडे जावे, तो दर्गा हटवावा म्हणून टाटांनी खूप प्रयत्न केले. त्यांना वेगळीकडे जागा देण्याची तयारी दाखवली. फकिरांनी त्यांचा प्रस्ताव अमान्य केला. त्या जागेवरून हटण्यास नकार दिला. तेव्हा टाटांकडे तो प्रकल्प दुसरीकडे हलविण्याखेरीज पर्याय नव्हता. टाटांनी जायचे कुठे, म्हणून सर्व्हे सुरू केला.

त्यांच्या नजरेने नागपूरला पसंती दिली. पाण्याने शुक्रवार तलावाच्या शेजारची जमीन निश्चित केली. जानोजी भोसले (दुसरे) यांच्याकडून ती विकत घेतली. त्यांच्या या निर्णयाला सगळ्यांनीच नावे ठेवणे सुरू केले. दलदलीच्या जमिनीतून काय निघणार, असा त्यांचा प्रश्न होता. त्यांचे शेअर्स घेण्यास लोक मागे-पुढे बघत होते. १ जानेवारी १८७७ रोजी व्हिक्टोरिया राणीने स्वत:ला सम्राज्ञी घोषित केले आणि त्याचदिवशी या गिरणीची यंत्रे चालू लागली, असे सांगितले जाते. १५ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या या गिरणीचे भांडवल १९०८ मध्ये ४७ लाखांपर्यंत पोहोचले. नागपूर, उमरेड, भंडारा परिसरातील वस्त्रोद्योगाशी संबंधित अनेक कामगार तेथे काम करू लागले. या मोठ्या गिरणीने नागपूरचे चित्र बदलविण्यास काही अंशी हातभार लागला. नागपूरच्या जडणघडणीत एम्प्रेस मिलचा मोठे योगदान आहे. या मिलमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी नंतर कामगार संघटनेचे नेतृ्त्व केले. संघटनेतीलअंतर्गत वादामुळे आणि सरकारने केलेल्या दुर्लक्षितपणामुळे नतर ही मिलबंद पडली. आता तेथे मॉल उभा आहे.

हे ही वाचा…Maharashtra Elections 2024 : बुलढाण्यात महाविकास आघाडीत पेच

खनिजाचाही शोध

जमशेदजी टाटा यांना गडचिरोली, चंद्रपूर व त्या भागात मोठ्या प्रमाणात खनिज असल्याची माहिती होती. त्यांनी त्याचा शोधही घेतला, पण त्या काळात त्यांना अडचणी आल्याने त्यांनी पूर्वीच्या बिहारकडे (आताचा झारखंड) धाव घेतली.