नागपूर : बार्टी, सारथी, महाज्योती आणि ‘टीआरटीआय’च्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी आठ संस्थांची निवड केली जात आहे. त्यांच्या निविदा मंजुरीसाठी ‘टीआरटीआय’चे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नावाने याच संस्थेतील एक अधिकारी लाच मागत असल्याची गंभीर तक्रार राज्य सरकारकडे झाली आहे. विशेष म्हणजे, ‘टीआरटीआय’च्या ‘टीईटी’, ‘पीएसआय’ परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी निविदा भरणाऱ्या संस्थांची प्रत्यक्ष पडताळणी करताना या अधिकाऱ्याने लाच आणि लाभातील २५ टक्के भाग मागितल्याचा धक्कादायक आरोप या तक्रारीत केला आहे. राज्य शासनाने याची गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे.
‘बार्टी’, महाज्योती, सारथी, अमृत, टीआरटीआय अशा विविध संस्थांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एकसमान धोरण निश्चित करण्याचा निर्णय राज्य शासनाने ऑक्टोबर २०२३ मध्ये घेतला. याअंतर्गत या संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी व संनियंत्रण करण्यासाठी आयुक्त ‘टीआरटीआय’ यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. विशेष म्हणजे, ही समिती स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणाऱ्या आठ खासगी संस्थांची निवड करणार असून त्यांच्याकडूनच प्रशिक्षण योजना राबवणे सर्वांना बंधनकारक असणार आहे. त्यानुसार नुकतेच यूपीएससी, एमपीएससी, बँक रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती अशा एकूण ९ परीक्षांसाठी प्रशिक्षण संस्थांची निवड करण्याकरिता ई-निविदा मागवण्यात आल्या. परंतु, निविदा मंजूर करून देण्यासाठी ‘टीआरटीआय’चे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचे नाव सांगून त्यांच्याच संस्थेतील एक अधिकारी लाच मागत असल्याची गंभीर तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे करण्यात आली आहे. यासोबतच ‘टीआरटीआय’कडून स्वतंत्रपणे राबवण्यात येणाऱ्या ‘टीईटी’, ‘पीएसआय’ परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी निविदा भरणाऱ्या संस्थांची प्रत्यक्ष पडताळणी करताना या अधिकाऱ्याने काही संस्थांना तीन लाख रुपये आणि लाभातील २५ टक्के वाटा मागितल्याची तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. डॉ. भारूड यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून संपूर्ण निविदा प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सांगितले आहे. या तक्रारीची दखल राज्य सरकारने घेतल्याची माहिती आहे.
हेही वाचा – नागपूर : युवकाने आईच्या मदतीने केला भावाचा खून, परस्पर अंत्यविधी करण्याचा प्रयत्न
फसवणुकीला बळी पडू नका : डॉ. भारूड
निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ३ जुलैपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत आहे. त्यामुळे असे आरोप करणे चुकीचे आहे. याशिवाय निविदा पूर्ण झाल्यावर सर्व संस्थांची पडताळणी होणार आहे. तसेच संनियंत्रण समितीमध्ये असणाऱ्या बार्टी, सारथी, महाज्योतीच्या सर्व अधिकाऱ्यांसमोर निविदा प्रकियेत सहभागी संस्थांचे सादरीकरण होणार आहे. मी एकटा कुठल्याही संस्थेची निवड करणार नाही. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यामुळे कुठल्याही संस्थांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन ‘टीआरटीआय’चे आयुक्त आणि स्पर्धा, परीक्षा अंमलबजावणी व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले आहे.