स्टार्टअपबाबत तरुणांना माहिती देण्यासाठी कौशल्य, रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता समितीच्यावतीने १७ ते २६ ऑगस्ट दरम्यान नागपूर जिल्ह्यात स्टार्टॲप आणि नाविन्यता यात्रा काढण्यात येणार आहे.
यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना नाविण्यपूर्ण संकल्पना, त्याचे पैलू तसेच विभागामार्फत राबण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत माहिती देण्यात येईल. तसेच नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी केली जाईल. जिल्ह्यातील नवउद्योजकांचा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन, मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे, जिल्ह्यातील उद्योजकता व नाविन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे हा या यात्रे मागचा उद्देश आहे. ज्या उमेदवारांनी नाविन्यपूर्ण उपक्रम केले किंवा ते करण्यास इच्छुक आहेत त्यांना त्यांच्या कौशल्याची माहिती इतरांना देण्याची संधी या यात्रेद्वारे मिळणार आहे.
१५ व १६ सप्टेंबरला गरजू उमेदवारांना तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे, नागपूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय या उपक्रमामध्ये सहभाग राहणार आहे, इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर यांचेशी संपर्क साधावा,(०७१२-२५३१२१३) असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.