लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : माटे चौक ते आयटी पार्क या रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणाचा सर्वसामान्य जनता आणि या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असतानाही हे अतिक्रमण कायमस्वरूपी का हटवले जात नाही? विक्रेत्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना सर्वसामान्यांच्या त्रासाबाबत काहीच देणे-घेणे नाही का? अतिक्रमण विभाग झोपेचे सोंग का घेत आहे? असे अनेक सवाल प्रशासनाच्या बेपर्वा वृत्तीला कंटाळून नागरिकांनी उपस्थित केले आहेत.

वर्तमानपत्रात बातमी आली की थातूरमातूर कारवाई करायची आणि नंतर पुन्हा या ज्वलंत समस्येकडे डोळेझाक करायची, असे सध्याचे या मार्गाचे चित्र आहे. लोकांसाठी तयार केलेला रस्ता लोकांनाच वापरता येत नाही, पदपथावरून चालता येत नाही, वाहनधारकांसाठी जागा उरत नाही, आणि त्या विरोधात लोकप्रतिनिधी म्हणून कोणीही आवाज उठवत नाही, त्यामुळे लोकांनी दाद कोणाकडे मागायची. खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दादागिरी व झुंडशाहीला आवर घातला गेला नाही तर नागरिक या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.

आणखी वाचा-‘ मला आमदार करायला निघाले होते, आता पत्नीसाठी अडून ‘ या इच्छुकाने डागली खासदारावर तोफ.

अंबाझरी तलावासमोरील पुलावरून वाहतूक सुरू होताच माटे चौक ते आयटी पार्क चौकापर्यंतच्या रस्त्यालगत खाद्यपदार्थ विक्रेत्यांची येथे पुन्हा दुकाने लागली असून नव्याने गर्दी वाढू लागली आहे. पूर्वीपेक्षा दुकानांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना तसेच सामान्य नागरिकांनाही या अतिक्रमणाचा फटका बसत आहे. ग्राहक रस्त्यावरच वाहन ठेवत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून याकडे पोलीस आणि महापालिकेचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत आहे.

आयटी पार्क ते माटे चौकापर्यंतच्या रस्त्यावर जवळपास दीडशेवर खाद्यपदार्थांची दुकाने विनापरवानगी सुरू आहे. पदपथावर खुर्च्या टाकून ग्राहकांना खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. आधीच दुकानांनी अर्धा रस्ता व्यापला आहे. त्यात पुन्हा ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघातही वाढले आहेत. स्वामी विवेकानंद चौकातून अंबाझरी टी-पॉईंट चौकापर्यंतचा रस्ता बंद असताना हातठेल्यांची संख्या कमी होती. मात्र, पुलावरून वाहतूक सुरू होताच ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे जवळपास दीडेशेवर हातठेलेचालकांनी या रस्त्यावर ठाण मांडले आहे.

आणखी वाचा- उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंची टीका; म्हणाले, “आज तीच वेळ…”

वाहनांची वर्दळ माटे चौकातून जास्त आहे. त्यात पुन्हा रस्त्यावर खाद्यपदार्थांची दुकाने पदपथावरच थाटल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडली आहे. ‘लोकसत्ता’ने याआधी या समस्येला वाचा फोडली होती. त्यानंतर पोलीस आणि महापालिकेच्या पथकाने कारवाईचा नुसताच देखावा केला. परंतु, या कारवाईनंतर दोन तासांतच महापालिका आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून या रस्त्यावर पुन्हा दुकाने सुरू झाली.

‘वसुली’मुळे कारवाई नाही?

या परिसरातील नागरिक हातठेल्यामुळे निर्माण होणाऱ्या त्रासाला कंटाळले आहेत. परंतु, सोनेगाव वाहतूक पोलीस, महापालिका पथक आणि प्रतापनगर पोलीस, बजाजनगर पोलीस खाद्यपदार्थांच्या दुकानदारांकडून महिन्याकाठी वसुली करतात. खाद्यपदार्थांच्या ठेल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असूनही वाहतूक पोलीस कारवाई करीत नाहीत, अशी चर्चा आहे.

आणखी वाचा-नक्षलवाद्यांच्या गड अबुझमाडमध्ये गडचिरोली पोलिसांची पहिल्यांदाच मोठी कारवाई, मृत नक्षल्यांची ओळख पटली

महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला असून लवकरच महापालिका व पोलीस संयुक्तरित्या कारवाई करणार आहे. तसेच ज्या वाहनांच्या संरचनेत बदल करून दुकाने थाटली आहेत, ती वाहने आरटीओशी पत्रव्यवहार करून जप्त करण्यात येतील. -माधुरी बाविस्कर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Encroachment by food vendors is a serious problem on mate chowk to it park road adk 83 mrj