नागपूर : नागपुरात रस्ते रुंद आहेत, पदपथही मोठे आहेत. पण ते फुटकळ विक्रेत्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यावर चालणाऱ्यांना त्याचा उपयोग होत नाही. दक्षिण-पश्चिम नागपुरातील प्रतापनगर भागातील पदपथावर झालेले अतिक्रमण हा ज्येष्ठ नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे.
माटे चौक ते प्रतापनगर चौक सिंमेट रोड साठ फुटाचा असताना दोन्ही बाजूचे पदपथ अतिक्रमणाने गिळंकृत केले आहे . महापालिका व पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांचे फावले आहे. .गेल्या १५ वर्षा पासून या मार्गा वरील पदपथावर फळ विक्रेते, भाजी विक्रेते व खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. फुलविक्रेते रस्ते मालकीचे असल्यागत वागत आहे. जेष्ठ नागरिकांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक नाही. त्यांना मुख्य रस्त्याने जावे लागते या बाबत महापालिकेत अनेकदा तक्रारी ज्येष्ठ नागरिकांनी केल्या त्यानंतर फक्त थातुरमातूर कारवाई केली जाते.

.चिंचभवनमध्ये विळखा

वर्धा मार्गावरील चिचभवन थांब्या नजिकच्या रस्त्यावर फुटकळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. तेथे रस्त्याच्या बाजूला मोकळी जागा लोकांना अवागमनासाठी आहे. त्यावर खाद्यपदार्थ विक्रेते, भाजी, फळ विक्रेत्यांनी ताबा घेतला आहे. येथे हॉटेल आहे. तेथे येणाऱ्या ग्राहकांचे वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. मुख्य रस्त्यालगतच्या रस्त्यावर शाळेची वाहने विरूद्ध दिशेने येतात त्यामुळे अनेकदा अपघात होतात. वाहन कोंडी नित्याची झाली आहे. चार सहा महिन्यांत एकदा अतिक्रमण पथक येते, पण नंतर पुन्हा जैसे थे स्थिती होते.