नागपूर:व्यापाऱ्यांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून त्यांचे कोट्यवधी रुपये गिळंकृत करणारा पंकज नंदलाल मेहाडिया आणि त्याच्याशी सलग्नींत १३ ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) शुक्रवारी कारवाई केली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पंकज मेहाडिया यांच्याशिवाय आर. संदेश समूहाचे संचालक रामू ऊर्फ रामदेव अग्रवाल, संजय अग्रवाल, अनिल पारख, लोकेश जैन, शैलेंद्र अग्रवाल, सनविजयचे संचालक संजय अग्रवाल, सुरेश बाजोरीया आणि मुंबई येथील विनोद गर्ग यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.
हेही वाचा >>> विदर्भाच्या नंदनवनातील स्ट्रॉबेरीची चव खास; पर्यटकांसाठी पर्वणीच…
कारवाई मुंबई येथून आलेल्या ईडी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. नागपूरच्या नऊ ठिकाणांसह मुंबईत विनोद गर्ग यांच्यासह चार ठिकाणी छाप्याची कारवाई केली जात आहे. याबाबत अद्यापही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत नसले तरी सूत्रांनी कारवाई झाल्याचे स्पष्ट केले आहे. पंकज मेहाडिया यांनी शहरातील अनेक लोकांना कोट्यवधी रुपयाची फसवणूक केली आहे. त्याप्रकरणी मे २०२२ मध्ये प्रेमलता नंदलाल मेहाडिया (वय ७२), लोकेश संतोष जैन (वय ४३, रा. सदर), कार्तिक संतोष जैन (वय ४०, रा. सदर) आणि बालमुकुंद लालचंद केयाल (वय ५५, रा. देशपांडे ले-आऊट) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार मेहाडिया याला अटक करण्यात आली होती रामदास पेठच्या रामू उर्फ रामदेव अग्रवाल यांच्या निवासस्थानासह, संदेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या संदेश सिटी ग्रुपच्या कार्यालय आणि अग्रवाल यांच्या सन विजय कंपनीच्या संजय अग्रवाल यांच्या ग्रेट नाग रोडवरील कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे.