नागपूर : नागपूरसह राज्यातील तीनशेहून अधिक मंदिरामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाने वस्त्रसंहिता लागू केली असली तरी उपराजधानीत मात्र या वस्त्रसंहितेची अंमलबजावणी करणे मंदिर व्यवस्थापनाला अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे नागपुरात ज्या चार मंदिरात वस्त्रसंहिता लागू केली होती त्या ठिकाणी वस्त्रसंहितेचे फलक लावण्यात आले असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र केली जात नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरामध्ये वस्त्रसंहिता असली पाहिजे यासाठी नागपुरातून सुरुवात करण्यात आली होती. नागपुरातील टेकडी गणेश मंदिर, धंतोलीतील गोपालकृष्ण मंदिर, बेलोरीतील (सावनेर) श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर, कान्होलीबाराचे श्री बृहस्पती मंदिर आणि मानवता नगरातील श्री हिलटॉप दुर्गामाता मंदिर या मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू केली होती. त्यानुसार त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मंदिर व्यवस्थापनाने तयारी सुरू केली. त्यानंतर राज्यातील विविध भागातील मंदिरामध्ये वस्त्रसंहिता करण्याचा निर्णय महासंघाने घेतला. राज्यातही अनेक मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता (ड्रेस कोड) लागू केला केल्यानंतर मंदिर परिसरात यासंदर्भात फलक लावण्यात आले होते. त्यामुळे काही संस्थानी निर्णयाचे न स्वागत करण्यात आले होते तर काही सामाजिक संघटनांनी त्याला विरोधही केला.
हेही वाचा >>>“चंद्रपूर लोकसभा मतदार संघावर आमदार प्रतिभा धानोरकर यांचा पहिला हक्क”, जिल्हाध्यक्ष धोटे म्हणाले…
नागपुरात टेकडी गणेश मंदिरात व गोरक्षणमधील कृष्णाच्या मंदिरात याची सुरुवात करून वस्त्रसंहिताचे फलक लावण्यात आले. मात्र, गेल्या दोन महिन्याभरात मंदिर व्यवस्थापनाला वस्त्रसंहिताचा निर्णय लागू करणे अडचणीचे ठरत आहे.राज्यात तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली होती.
हेही वाचा >>>परिवहन विभागाकडून लांब पल्ल्याच्या बस चालकांची मद्य तपासणी; अपघात टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना
त्यासंदर्भातील फलक लावण्यात आल्यानंतर मंदिरात तोकडे कपडे घालणाऱ्यांना प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, तिथे भविकांच्या विरोधानंतर काही तासातच मंदिर संस्थानाने भूमिका बदलत निर्णय मागे घेतला आहे. आता श्रावण महिन्यात सणासुदीचे दिवस असताना विविध मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. त्यामुळे नागपूरसह राज्यातील इतर मंदिर व्यवस्थापनाकडून या निर्णय राबवला जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.याबाबत टेकडी गणेश मंदिर व्यवस्थापन समितीचे सचिव श्रीराम कुळकर्णी म्हणाले, वस्त्रसंहिता मंदिरात लागू करण्यात आल्यानंतर आम्ही मंदिरात फलक लावले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी करताना आम्हाला अडचणी येत आहेत. मंदिरात येणाऱ्यांनी स्वत:हून नियमांचे पालन केले पाहिजे.
मंदिरात वस्त्रसंहिता बाबतची अंमलबजावणी राज्यातील अनेक मंदिरात सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी विरोध होत आहे तिथे भाविकांना समजवले जात असून जनजागृती करण्यात येत आहे. मंदिरात अडचणी आहेत मात्र त्याबाबत मंदिर व्यवस्थापनांना याबाबतीत पत्र दिले जात आहे.