वर्धा: स्वयंरोजगाराचा संकल्प ठेवत अभियंता असलेल्या भामकर बंधूंनी खादी वस्त्र प्रावरणात घेतलेली भरारी नवउद्योजकांना प्रेरणादायी ठरत आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या रोहन व अभिजीत रमेश भामकर या बंधूंनी स्वावलंबी होवू इच्छिनाऱ्या युवकांसाठी एक आदर्श निर्माण केल्याचे म्हटले जाते. अनुक्रमे यांत्रिकी व संगणक शाखेत या दोघांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. मात्र नोकरीच्या पारंपारिक मानसिकतेत न राहता स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा चंग त्यांनी बांधला. जिल्ह्यात खादी कापडाचे विशेष उत्पादन होते. या खादीचे तयार कपडे विकून ते देशभर विकण्याची त्यांनी तयारी सुरू केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्याेग सुरू करण्यासाठी वडिलांची प्रेरणा होतीच. त्यामुळे पुरेसे भांडवल नसल्याने त्यांनी कौटुंबिक मालमत्ता कर्जासाठी बँकेकडे गहाण ठेवली. मात्र वर्ष लोटूनही कर्ज मंजूर झाले नाही. तसेच स्थानिक प्रशासनाकडून उद्योगाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत गेल्या. शेवटी त्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली. त्याची चांगलीच चर्चाही झाली. मात्र कुठून कळ फिरली, ते कळले नाही. पण अडचणी दूर झाल्या. ‘फॅब सिग्निचर’ या नावाने त्यांचा ब्रँड जन्मास आला. आधुनिक पद्धतीचे फॅशनेबल कपडे तयार करण्यासाठी त्यांनी तायवानवरून यंत्र सामग्री बोलावली. शर्ट, कुर्ता, पँट तयार करणे सुरू झाले. त्याची आता लक्षणीय प्रमाणात ऑनलाईन विक्री होत आहे. या ब्रँडचे देशभर विक्रीकेंद्र स्थापन करण्याची त्यांची मानसिकता आहे.

हेही वाचा… नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी राहण्याची शक्यता; भारतीय हवामान खात्याचा अंदाज

उद्योगाची सुरूवात मात्र करोना संक्रमणकाळात सुरू झाली होती. या काळात मोठ्याप्रमाणात मुखपट्यांची मागणी होती. पाेलीस तसेच आरोग्य विभागाने त्यासाठी सर्वत्र शोध सुरू केला होता. मात्र भामकर बंधू कामात आले. केवळ मुखपट्याच नव्हे तर पीपीई किट व डॉक्टरांसाठी ॲप्रॉन तयार करून देण्याचे काम या उद्योगातून झाले. दहा हजारापेक्षा अधिक मुखपट्यांचा त्यांनी पुरवठा केला. विशेष म्हणजे त्यांच्या उद्याेगात त्यांनी केवळ महिलांना रोजगार दिला आहे. प्रकल्प समन्वयक पोर्णिमा भामकर सांगतात की शिवणकामाचे महिलांमध्ये उपजत कौशल्य असते. तसेच महिलेचे आर्थिक कमाई केवळ कुटुंबावरच खर्च होत असल्याने महिलांना रोजगार देण्याचे धोरण आम्ही ठेवले आहे.

हेही वाचा… मराठा आरक्षण आंदोलन: नागपूरमधील ‘एसटी’ची तीन हजार किलोमीटरची वाहतूक रद्द

७० महिला सध्या काम करत असल्याचे त्या म्हणाल्या. सध्या या कंपनीतर्फे वर्धेतील बहुतांश महाविद्यालयांना तसेच बाहेरच्या संस्थांना पण विद्यार्थ्यांचे गणवेश तयार करून देण्याचे काम होत आहे. चार वर्षापासूनची मेहनत व त्यासाठी ठेवलेली चिकाटी यामुळे उद्योग बाळशे धरत आहे. वर्धा जिल्हा खादीवस्त्र प्रावरणाचे मोठे केंद्र व्हावे, असा उद्देश असल्याचे रोहन भामकर म्हणतात. गांधींची खादी नव्या पिढीत लोकप्रिय करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.