नागपूर : नैसर्गिक संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्यांवर अलीकडे वन्यप्राण्यांचे नवे संकट उभे ठाकले आहे. या संकटात वर्षभराच्या त्याच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. हे नुकसान टाळण्यासाठी पंचविशीतला एक अभियंता शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन आला आहे. पक्षी आणि प्राण्यांपासून पीक संरक्षण करणारे ड्रोन त्याने विकसित केले आहे. दिल्ली येथे आयोजित प्रधानमंत्री किसान संमेलनात त्याच्या या प्रणालीची दखल देशातीलच नाही तर विदेशातीलही कृषीमंत्र्यांनी घेतली.
शेतात पीककापणीची वेळ येते तेव्हाच नेमका वन्यप्राण्यांचा धुडगूस सुरू होतो. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी फटाके फोडण्यासारख्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत असले तरीही ती फारशी प्रभावी नाही. त्यामुळेच अपेक्षित सोनोले या तरुण अभियंत्याने एक असे ड्रोन तयार केले आहे, जे शेतात येणाऱ्या वन्यप्राण्यांना, प्राण्यांना आणि पक्ष्यांना ओळखते आणि त्यांना शेतात येण्यापासून प्रतिबंध करेल. विशेष म्हणजे, हे ड्रोन रिमोटने चालवण्याची गरज नाही, तर ते स्वयंचलित आहे. प्राण्यांना कोणतीही दुखापत न करता मानसिकरीत्या त्यांना शेतात येण्यापासून हे ड्रोन परावृत्त करते. शेत लहान असेल तर बरेचदा असे अत्याधुनिक यंत्र शेतकऱ्यांना परवडणारे नसतात. पण एकमेकांना शेत लागून असेल तर शेतकरी एकत्र येऊनदेखील ही प्रणाली शेतासाठी वापरू शकतात.
शेतावर काम करण्यासाठी कामगार मिळत नाहीत, मिळाले तरी त्यांना मोबदला देणे परवडत नाही. अशा स्थितीत ती प्रणाली शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहे. कारण ती केवळ स्थापित करण्याचाच खर्च असतो. त्यानंतर कोणताही खर्च येत नाही. नवी दिल्ली येथे आयोजित प्रधानमंत्री किसान संमेलनात भारतातील ज्या मोजक्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना स्थान देण्यात आले, त्यात हे ड्रोनही होते. नीती आयोग, गृह मंत्रालय, पशुसंवर्धन मंत्रालय, कृषी मंत्रालयाशिवाय विदेशातील मंत्री आणि प्रतिनिधींनी या ड्रोनची दखल घेतली.
चोरी होण्याचाही धोका नाही ..
शेत कुंपणाच्या चारही टोकांवर चार ‘सेन्सर’ लावले जातात. हे ‘सेन्सर’ वन्यप्राणी, प्राणी कोणत्या दिशेने येत आहे ते ओळखते आणि लगेच ती माहिती ड्रोनला पाठवते. त्यानंतर ते ड्रोन आपोआप उडते आणि तो प्राणी सीमेच्या बाहेर घालवून परत ‘चार्जिग स्टेशन’वर येते. सौर ऊर्जेवर ते ‘चार्ज’ होते. झाड, विजेचा खांब, वायर यासारखा अडथळा देखील पार करते. पाऊस, वादळ, वारा याचा काहीच परिणाम त्यावर होत नाही. सहा ‘ब्लेड’ असणारे हे ड्रोन असून त्याला ‘नाइट व्हिजन’ कॅमेरा लागला आहे. सध्या या ड्रोनची मर्यादा १५ किलोमीटरचा परिसर व्यापेल इतकी आहे. ही प्रणाली वापरणाऱ्या व्यक्तीव्यतिरिक्त कुणी दुसरी व्यक्ती त्या ड्रोनजवळ गेली तर लगेच ते कळते. त्यामुळे चोरी होण्याचा धोकाही नाही.
सात वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा वडधामना गावात राहायला आलो, तेव्हा शेतकऱ्यांच्या समस्या अधिक गांभीर्याने जाणवायला लागल्या. त्यातूनही ही संकल्पना सुचली आणि त्यावर आम्ही काम करायला सुरुवात केली. नागपुरातील सोकारी एलएलपीची स्थापना २०२१ मध्ये अनिल सोनोले यांनी केली आणि त्याच ठिकाणी ही प्रणाली विकसित करण्यात आली. उत्कर्ष पीडीकेव्ही, अकोलाचे सहकार्य त्यासाठी आम्हाला मिळाले. शेतकऱ्यांसाठी ही प्रणाली वरदान ठरेल असा विश्वास आहे आणि यापुढेही त्यांच्याचसाठी काम करायचे आहे.
– अपेक्षित सोनोले, नागपूर