नागपूर : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा देशद्रोही अभियंता निशांत प्रदीपकुमार अग्रवाल याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. निशांत हा ब्रह्मोस एयरोस्पेसचा अभियंता होता आणि त्याने ब्रह्मोस मिसाईलबाबत अंत्यत गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविण्याचा आरोप आहे. या आरोपाखाली नागपूर सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निशांतने जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले होते. गुरुवारी याप्रकरणात सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला. न्या. अनिल किलोर आणि न्या. प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमक्ष ही सुनावणी झाली.
डीआरडीओच्या प्रकल्पात कार्यरत
नागपूरजवळच्या मोहगाव येथे डीआरडीओचा ब्रह्मोस मिसाईल प्रकल्प आहे. हा प्रकल्प भारत व रशियाच्या संयुक्त तंत्रज्ञानावर आधारित आहे. निशांत अटक होण्यापूर्वी चार वर्षांपासून या प्रकल्पात कार्यरत होता. निशांत नेहरूनगर, रुडकी, जि. हरिद्वार (उत्तराखंड) येथील रहिवासी असून तो भारत व रशियाचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीच्या नागपुरातील प्रकल्पामध्ये सिस्टिम इंजिनियर पदावर कार्यरत होता. तो उज्ज्वलनगर येथे भाड्याच्या घरात राहत होता. सत्र न्यायालयाने त्याला ३ जून २०२४ रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६-एफ अंतर्गत जन्मठेप, शासकीय गुपिते कायद्यातील कलम ३(१)(सी) अंतर्गत १४ वर्षे सश्रम कारावास तर, कलम ५(१)(ए)(बी)(सी)(डी) आणि कलम ५(३) अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. त्याविरुद्ध अग्रवालने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.
‘एटीएस’कडून अटक
पाकिस्तानमधून नेहा शर्मा व पूजा रंजन या नावाने फेसबुक तर, सेजल कपूर नावाने लिंक्ड-इन अकाऊंट संचालित केले जात होते. भारताच्या सुरक्षा विभागातील काही कर्मचारी या गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याची माहिती लखनौ एटीएस कार्यालयाला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी २०१८ मध्ये भादंवि कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, १२१-ए, १२०-बी, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६-एफ व शासकीय गुपिते कायद्यातील कलम ३, ४, ५ व ९ अंतर्गत एफआयआर दाखल करून तपास सुरू केला असता अग्रवालसह कानपूर येथील कर्मचारी देबमाल्य रॉय व आरती कोल्हे यांची नावे पुढे आली. त्यानंतर अग्रवालला ८ आक्टोबर २०१८ रोजी अटक करण्यात आली होती. अटक झाल्याच्या सहा वर्षांंनंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली.