एका मुलीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा
नागपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीचे तिच्या वसतिगृहातून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी प्रियकरासह एका मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चेतन हनुमया दासर (२३) रा. वेकोलि कॉलनी, चंद्रपूर आणि अपूर्वा रा. चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत. पीडित १९ वर्षीय मुलगी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असून वसतिगृहात राहते. दहावीपर्यंत तिची आरोपी चेतनशी ओळख होती. तो तिचा प्रियकर होता. बारावीनंतर तिने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले व नागपुरात शिकायला आली. त्यामुळे आरोपी तिच्यावर रागावलेला होता. तो तिचा पाठलाग करायचा. शनिवारी रात्री ८.४५ वाजता तो आपल्या एका मैत्रिणीला घेऊन कारने तिच्या वसतिगृहाबाहेर आला. तेथे अपूर्वाला तिच्या वसतिगृहात पाठवले व बाहेर बोलावून घेतले. कारमध्ये ती बसली असता आरोपी तेथे होता.
त्यानंतर त्याने कार सुरू करून अपहरणाचा प्रयत्न केला. पण, ती लगेच कारमधून उतरली. चेतन हा कारखाली उतरला व त्याने तिला वसतिगृहात शिरून मारहाण केली. यानंतर आरोपी पळून गेले. तिने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सहाय्यक फौजदार राजेश राऊत यांनी गुन्हा दाखल केला.