अमरावती : महापालिकेने खासगी इंग्रजी माध्यमातील शाळांना आव्हान देण्याची तयारी पूर्ण केली असून यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून महापालिकांच्या शाळांमध्ये नर्सरी, केजी १, केजी २ व इंग्रजी माध्यमांच्‍या पहिल्‍या वर्गाच्‍या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी सातत्‍याने पाठपुरावा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक स्पर्धेत मुले मागे राहू नये, या हेतूने अनेक पालक परिस्थिती नसताना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांत पाल्यांना प्रवेश देतात. त्यामुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्याही दिवसेंदिवस रोडावत आहे. गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना महागडे शिक्षण परवडत नसल्याने त्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घ्यावे लागते. मात्र, या शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. यासंदर्भात सुलभा खोडके यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाचा आढावा प्रत्यक्ष शाळांची पाहणी केली. उपाययोजनांबाबत सूचना केल्या. त्या अनुषंगाने आता महापालिकांच्या शाळांमध्ये नर्सरी, केजी १ -२ तसेच इंग्रजी माध्यमांचा पहिला वर्ग सुरू झाला आहे. अमरावती महापालिकाद्वारा संचालित आठ उच्च प्राथमिक शाळांमध्ये स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर उच्च माध्यमिक शाळा म्हणजेच नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी दिली आहे.

हेही वाचा – अमरावती : ‘खारपाणपट्ट्यातील प्रायोगिक प्रकल्‍पात कंत्राटदाराचेच भले’, शेतकरी नेते अरविंद नळकांडे यांचा आरोप

उर्दू उच्च माध्यमिक शाळा क्रमांक ८ जमील कॉलनी या ठिकाणी अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेत यंदापासून प्रवेश दिले जाणार आहे. महापालिकेच्‍या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार असून शिक्षणासोबतच डिजिटल वर्ग, क्रीडा साहित्य, पोषण आहार शिवाय गणवेश, पुस्तकेसुद्धा मोफत उपलब्ध होणार आहेत.

शहराच्या पश्चिम भागात महापालिकेचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाल्याने स्थानिक विद्यार्थ्यांबरोबरच आसपासच्या गावांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. शहराच्या मध्यभागातील महाविद्यालये दूर अंतरावर असल्याने व महागडे शिक्षण अवाक्याबाहेर जात असल्याने या भागातील अनेक विद्यार्थ्‍यांना शाळा सोडावी लागली.

हेही वाचा – वर्धा : ‘मोदी सरकारची नऊ वर्षांतील कामे हाच २०२४ च्या यशाचा पासपोर्ट’

महापालिकांच्या सर्व शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व सर्व सोयी-सुविधा शाळा प्रवेशाच्या वेळीच उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना महापालिकेच्‍या शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत, असे सुलभा खोडके यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: English medium classes admission started in amravati mnc schools mma 73 ssb