गडचिरोली : नक्षलवाद्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कवंडे येथे तब्बल एक हजार जवानांनी अवघ्या २४ तासात पोलीस मदत केंद्र उभारल्याने नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.
कवंडे हे गाव छत्तीसगड सीमेपासून केवळ दोनशे मीटर अंतरावर असल्याने नक्षलवादी येथून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करायचे. परंतु हे केंद्र उभारल्यामुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त करण्याची घोषणा केल्यानंतर देशभरात नक्षलविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यातही नक्षलवादावर अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मागील तीन वर्षात गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड अबुझमाड सीमेवर सात पोलीस मदत केंद्राची स्थापना केली आहे.
यातील भामरागड तालुक्यात येत असलेल्या नेलगुंडा, पेनगुंडा आणि कवंडे ही गावे नक्षलवाद्यांचे नंदवन म्हणून ओळखल्या जायचे. मात्र, गेल्या तीन महिन्यात या तीनही गावात गडचिरोली पोलिसांनी रस्ते, मोबाईल नेटवर्कसह पोलीस मदत केंद्र उभारून नक्षलवादाचे कंबरडे मोडले आहे. कवंडे येथून जवळ असलेल्या इंद्रावती नदीपासून छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्याची सीमा आहे. हा परिसर नक्षलवादी कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे.
त्यामुळे नदीवरील पुलाचे काम काही महिन्यांपासून रखडले आहे. कवंडे येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना झाल्याने लवकरच हा मार्ग पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे नेलगुंडापासून कवंडेला जाण्यासाठी रस्ताच नव्हता. जवानांनी २४ तासात रस्ता बनवून सर्व साहित्य नेले.
यावेळी घेतलेल्या जनजागरण मेळाव्यात गावाकऱ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह गावकरी व जवान उपस्थित होते.
‘अबुझमाड’ला घेराव
कवंडेला नक्षलवाद्यांचे गड अबुझमाडची सीमा लागून आहे. गेल्या काही महिन्यांपासून छत्तीसगडसह गडचिरोली पोलिसांनी अबुझमाडमध्ये शिरून कारवाया केल्या आहेत. छत्तीसगड पोलिसांच्या कारवायांपासून वाचण्यासाठी नक्षलवादी कवंडे परिसरात लपून बसायचे मात्र, येथेही पोलीस मदत केंद्र उभे राहिल्याने दोनशे चौरस मिटरचा हा भुभाग पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यामुळे भविष्यात अबुझमाडमध्ये नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी कवंडे पोलीस मदत केंद्र महत्वाची भूमिका निभावणार आहे.
नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात आठ किलोमीटर रस्ता बनवून २४ तासात या पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली. छत्तीसगड सीमेवरून प्रवेश करणाऱ्या नक्षलवाद्यांची यामुळे नाकेबंदी झाली आहे. गेली अनेक वर्ष ही गावे मुख्य प्रवाहापासून लांब होती. या पोलीस मदत केंद्रामुळे लवकरच येथे सर्व शासकीय सुविधा उपलब्ध होणार आहे.-नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली