नागपूर : विधानसभा अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नागपुरात तृतीयपंथींनी विधानभवनात प्रवेशपत्राविना जाण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा रक्षकांनी काही वेळासाठी प्रवेशव्दार बंद केले. सात डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्यानिमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हेही वाचा – “जुनी पेन्शन लागू न केल्यास शासकीय कर्मचाऱ्यांचे कामबंद”, आमदार किरण सरनाईक यांचा इशारा
विधानभवनातही प्रवेशपत्र असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जातो. मंगळवारी दुपारी काही तृतीयपंथींनी त्यांच्या विविध मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी विधानभवनात प्रवेश करू देण्याची विनंती प्रवेशव्दारावरील सुरक्षा रक्षकांना केली. मात्र त्यांच्याकडे प्रवेश पत्रिका नसल्याचे सुरक्षा रक्षकांनी त्यांना आत सोडण्यास नकार दिला. मात्र तृतीयपंथीयांचा आतमध्ये प्रवेश द्यावा यासाठी आग्रह कायम होता. त्यामुळे तेथे गोंधळ उडाला. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काही वेळासाठी प्रवेशव्दार बंद केले. त्यानंतर काही वेळातच तृतीयपंथीय तेथून निघाले. त्यानंतर प्रवेशव्दार पुन्हा सुरू करण्यात आले. विधानभवन परिसरात असलेल्या प्रसार माध्यमांशी आम्हाला संवाद साधायचा आहे, असे तृतीयपंथीयांचे म्हणणे होते.
ट्रान्स जेंडर बोर्ड स्थापन करा -दानवे
तृतीयपंथी समाजाला सन्मानाची वागणूक मिळावी, यासाठी ट्रान्स जेंडर बोर्डाची स्थापना करावी. या वर्गाच्या विकासासाठी धोरण आखावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी विशेष उल्लेखद्वारे सभागृहात केली. तृतीयपंथींसाठी विनामूल्य गृह योजना, स्वतंत्र शौचालय, सरकारी रुग्णालयात मोफत उपचार व स्वतंत्र वॉर्ड आदींबाबत सरकारने पावले उचलावीत,अशी सूचना दानवे यांनी सभागृहात केली