देवेश गोंडाणे
ग्राहकांना टिकाऊ उपभोग्य वस्तू हप्तय़ावर विकत देणाऱ्या खासगी वित्त संस्थांनी आता ‘जेईई’, ‘नीट’चे प्रशिक्षण देणाऱ्या नामवंत शिकवणी वर्गामध्ये शिरकाव केला आहे. शिकवणी वर्गही वाढत्या स्पर्धेमुळे अशा वित्त कंपन्यांच्या मदतीने पालकांना सहज कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून प्रवेशक्षमता वाढवत गडगंज संपत्ती उभी करत असल्याचे चित्र आहे.
‘आयआयटी’ आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे राज्यात शिकवणी वर्गाचे जाळे उभे राहिले. देशातील नामवंत शिकवणी वर्गानी राज्याच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आपले केंद्र सुरू केले. लाखो रुपयांचे शुल्क आकारून ‘तुमच्या पाल्यांना ‘आयआयटी’ आणि वैद्यकीय महाविद्यालयात १०० टक्के प्रवेशाचे दिवास्वप्न दाखवणाऱ्या नामवंत शिकवणी वर्गानी आता पालकांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तीय कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. सहज ग्राहक उपलब्ध होत असल्यामुळे कंपन्यांनीही शिकवणी वर्गामध्ये व्यवसाय वाढवायला सुरुवात केली.
शिकवणी वर्गात पालक आणि पाल्य माहितीसाठी आला की, त्यांनी पैशाची चिंताच करू नये, असा सल्ला दिला जातो. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पालक म्हणून उपराजधानीतील एका नामवंत शिकवणी वर्गात गेलो असता, सुरुवातीला त्यांनी संस्थेची माहिती देत शिकवणीसाठी वर्षांला दीड लाख रुपयांचे शुल्क सांगितले. शुल्क भरण्यासाठी दोन हप्ते मिळतील अशी सुविधा दिली. परंतु तरीही आर्थिक अडचण असल्याचे सांगताच एका नामवंत वित्त कंपनीकडून अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला. आम्ही होकार देताच दुसऱ्याच क्षणाला त्या वित्त कंपनीच्या प्रतिनिधीने सर्व माहिती दिली. नोकरी, व्यवसायाची माहिती घेऊन तो शिकवणी शुल्काचे संपूर्ण शुल्क एकाच वेळी देण्यास तयार झाला. मात्र ते शुल्क थेट शिकवणी वर्गाच्या बँक खात्यात जमा होणार होते. शुल्काची २० टक्के रक्कम जमा करून उर्वरित रकमेचे हप्ते पाडून शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा केला जाणार, असे सांगितले. आम्ही विचार करून सांगतो म्हणून स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न केला तरी वित्त कंपनीचा प्रतिनिधी विविध प्रलोभने दाखवून कर्ज घेण्यास आग्रह करत होता. हा संपूर्ण अनुभव पाहता शिकवणी वर्गानी वित्त कंपन्यांच्या मदतीने पालकांची जणू लूट सुरू केल्याचा प्रकार समोर आला.
वित्त कंपन्या, शिकवणी वर्गात करार
एका शिकवणी वर्गाच्या प्रमुखाशी चर्चा केली असता त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर वित्त कंपनी आणि शिकवणी वर्गामध्ये एक करार केला जातो असे सांगितले. या करारानुसार शिकवणी वर्गात येणाऱ्या पालकांना अर्थपुरवठा करून प्रवेशक्षमता वाढवण्याची जबाबदारी वित्त कंपन्यांची तर त्यांना अधिक ग्राहक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिकवणी वर्गाची असते. शिकवणी वर्गानी आपली सेवा घ्यावी यासाठी वित्त कंपन्या त्यांना आर्थिक प्रलोभनही देत असल्याची माहिती आहे.
पालकांची फसगत
शिकवणी वर्गात एखाद्या विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला की, त्याला तेथील शिक्षण आवडेलच असे नाही. त्यामुळे काही विद्यार्थी पहिल्या दोन ते तीन महिन्यांमध्येही प्रवेश रद्द करतात. मात्र अशा विद्यार्थ्यांने शिकवणीतील प्रवेशासाठी वित्त कंपनीकडून कर्ज घेतले असल्यास त्याचे संपूर्ण शुल्क जमा झालेले असते. शिवाय या कर्जाचे सर्व हप्ते चुकवणे पालकांना बंधनकारक असते. परिणामी वित्त कंपनीकडून कर्ज घेतल्याने शिक्षण आवडले नसतानाही विद्यार्थ्यांला त्या शिकवणीमधून प्रवेश रद्द करता येत नाही.
वित्त कंपन्या कर्जाची मदत करतात ही चांगली बाब आहे. यामुळे पाल्यांना उत्तम शिक्षण घेता येते. पालक घरातील वस्तूंसाठी अशा वित्त कंपन्यांचा लाभ घेतात. शिक्षणासाठी जर कंपन्या स्वत:हून मदत करतात. त्यामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या पालकांचा याचा फायदा होतो. – बंडोपंत भुयारी, अध्यक्ष, राज्य कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन.