लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : पश्चिम विदर्भातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी सुरक्षेच्या दृष्टीने काही सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काळे कपडे, वस्तूंसह पिण्याच्या पाण्याची बॉटल आणण्यास देखील मनाई करण्यात आली. आक्षेपार्ह वस्तू सोबत आणल्यास नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळी प्रवेश नाकारला जाणार असल्याचे सुरक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. सुरक्षेच्या कारणावरून विशेष दक्षता घेतली जात आहे.

पश्चिम विदर्भाच्या पाच जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होत आहे. यावेळी महायुतीतील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह पाचही जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कृषी विद्यापीठ परिसरात भव्य मंडप उभारला असून सभेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या सभेसाठी पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांमधून लाखो नागरिक येणार असल्याचा दावा भाजपच्यावतीने करण्यात आला.

आणखी वाचा-बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पूर्वसंध्येला सभास्थळी उपस्थित राहण्यासंदर्भात काही सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचना केंद्रीय सुरक्षा विभागाने दिल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. सभास्थळी उपस्थित राहण्यासाठी कोणीही काळ्या रंगाच्या वस्तू (शर्ट, रुमाल, ओढणी, स्कार्फ) सोबत ठेवू नये, लोखंडी अवजारे सोबत बाळगू नये, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल सोबत आणू नये, कोणतीही अशी वस्तू जी आक्षपार्ह असेल ती आणू नये आदी सूचना दिल्या आहेत. अशा कुठल्याही वस्तू सोबत असल्यास सभास्थळी प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मोदी काय भूमिका मांडणार?

विधानसभा निवडणुकीतील विदर्भातील नरेंद्र मोदी यांची पहिलीच सभा अकोल्यात होत असून ते काय भूमिका मांडतात? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात विरोध किंवा निषेधाचा सूर निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर सभास्थळापासून काळ्या वस्तू दूर ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या उपायोजना केल्या जात आहे, असे सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entry to narendra modis meeting venue will be denied if objectionable items are brought ppd 88 mrj