चंद्रपूर : “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे” अश्या शब्दात चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमुळे आणि वेकोलि खाणींमुळे होणाऱ्या प्रदूषणबाधित जनतेच्या भावना समजून घेत राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. श्रीमती पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात तातडीने एक तज्ज्ञ समिती गठीत करून यामध्ये लोकप्रतिनिधींचा यात समावेश करण्यात येईल व निर्णय घेण्यात येईल अशी घोषणा केली. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील वास्तव मांडल्यानंतर श्रीमती पंकजा मुंडे यांनी पंधरा दिवसांत चंद्रपूरमध्ये येऊन तोडगा काढणार असल्याचा शब्द दिला.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत प्रकल्पातील धुळीमुळे, तसेच वेकोलिमुळे होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. या विषयाचे गांभीर्य श्रीमती पंकजा मुंडे यांनी लक्षात घेतले. त्यानंतर तज्ज्ञांची व आमदारांची समिती गठीत करण्याचे व स्वतः चंद्रपूरला येऊन प्रत्यक्ष पाहणी करून बैठक घेणार असल्याचा शब्द दिला. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाच्या रकमेत वाढ करण्यासंबंधी तसेच बँक हमीची रक्कम वाढविण्या मोठा निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले.
या भागातील हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण याबाबत मोठ्या प्रमाणात काम करण्याची, उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली. याबाबत या परिसरातील उद्योगाचा सीएसआर त्याच ठिकाणी वापरून पर्यावरण संतुलनाचे काम करता येईल असेही त्या म्हणाल्या. एक जागरूक यंत्रणा चंद्रपूर जिल्ह्यात तयार करण्याचा विचार आहे असेही ना. मुंडे म्हणाल्या.
यासंदर्भात चर्चेची सुरुवात करताना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाच्या अधिकऱ्यांसह शेकडो कोटीचे उद्योग प्रस्थापित करणाऱ्या उद्योजकांच्या दुर्लक्षितपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वसामान्य माणसाच्या जीवाशी खेळण्याच्या या अपराधाबद्दल कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण मंत्र्यांकडे केली. चंद्रपूर औष्णिक वीज प्रकल्पासाठी प्रदूषण विभागाची मान्यता ही ३१ मे २०२४ पर्यंतच होती. त्यामुळे ही मान्यताच रद्द करण्याची पहिली मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली.
नूतनीकरण न करता थर्मल पॉवर स्टेशन सुरू असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले. या विज प्रकल्पाच्या करणाने होणाऱ्या प्रदूषणाबाबत कारवाई करताना पर्यावरण विभागाने केवळ १५ लक्ष रुपयांची बँक हमी जप्त केली. याबाबत मुनगंटीवार यांनी ही बँक गॅरंटी ५ कोटी रुपये करण्याची मागणी केली. यासोबतच वेस्टर्न कोल्ड फिल्ड मुळे होणाऱ्या प्रदूषण करवाईबाबत बोलताना त्यांची बँक गॅरंटीदेखील पाच लाखावरून पाच कोटी रुपये करण्यात यावी असा आग्रह धरला.
डब्लूसीएल क्षेत्रातील बँकर उडवताना मर्यादेपेक्षा अधिक डेसिमल आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढते आहे. वीज केंद्रातील कोल हॅण्डलिंग प्लांटची दुरवस्था झाली असून त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे अशीही मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली. या भागातील कामगार, रहिवासी यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागले आहेत, त्यांच्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठी आरोग्य शिबीरे व्हावीत, रुग्णांच्या शस्त्रक्रिया, उपचार यासाठी भरीव मदत मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी एक समिती प्रदूषणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गठीत करावी. यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी डिस्पले लावावेत अशी सूचना केली. प्रदूषणाच्या कायद्यात, नियमात बदल करावेत अशी अपेक्षाही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.