नागपूर : कोराडीतील नवीन ६६० मेगावाॅटच्या २ संचाच्या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतरही मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाबाबत मुंबईत बैठक घेत तातडीने हा प्रकल्प करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता या प्रकल्पावरून पुन्हा पर्यावरणवादी व सरकार समोरासमोर येण्याचे संकेत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पत्राद्वारे हा प्रकल्प इतरत्र करण्याची विनंती केली होती.
नागपूरसह विदर्भात सर्वाधिक औष्णिक विद्युत प्रकल्प असून त्याच्या प्रदूषणामुळे कर्करोगासह इतर आजार वाढल्याचे सांगत पर्यावरणवाद्यांनी कोराडीतील नवीन प्रस्तावित ६६० मेगावाॅटच्या २ संच असलेल्या प्रकल्पावर कडाडून विरोध केला होता. कोराडी प्रकल्प परिसरात झालेल्या सुनावणीत हा विरोध दर्शवला गेला. या मुद्यावर न्यायालयातही आवाहन दिले गेले होते. या मुद्यावर मुंबईत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. त्यात सुपर क्रिटीकल टेक्नाॅलाॅजीचा वापर करून हा प्रकल्प लवकर करण्याचे निर्देश दिले गेले.
विधानभवनातील समिती सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, कोराडी विद्युत प्रकल्पासाठी वेकोलिचा कोळसा वापरावा. जास्तीत जास्त क्षमतेने हा प्रकल्प चालवताना कमीत कमी प्रदूषण होईल याकडे लक्ष द्यावे. हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक होईल, याकडे लक्ष द्यावे. प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज कमीत कमी दरात मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्णन बी. यांनी या १४,३३७ कोटींच्या प्रकल्पासाठी आवश्यक जागा असून अतिरिक्त जागा लागणार नसल्याचे स्पष्ट केले. बैठकीला अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
छत्तीसगडजवळ आणखी एक प्रकल्प
महानिर्मितीकडून छत्तीसगडच्या गारेपालमा येथे एक कोळसा खाण घेण्यात आली आहे. तेथील कोळशाच्या वापरासाठी त्याच्याजवळच आणखी एक विद्युत प्रकल्प उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील बैठकीत दिले. त्यामुळे छत्तीसगडजवळ आणखी एक औष्णिक विद्युत प्रकल्प उभारण्याचे संकेत मिळत आहे.
…तर इतर मार्गाने आंदोलन- नायडू
केंद्र सरकार सौर ऊर्जेला महत्व द्यायला सांगत असताना राज्य शासन कोराडीतील नवीन औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी आग्रही असल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळे आधीच प्रदूषणाने त्रस्त नागपूरसह विदर्भात आणखी प्रदूषणाची समस्या वाढणार आहे. या प्रकल्पाविरोधात न्यायालयात लढा लढत आहे. सरकारने प्रकल्पासाठी जास्तच आग्रह धरण्याचा प्रयत्न केल्यास इतरही मार्गाने आंदोलनाबाबत विचार केला जाईल, असेही ‘व्ही-कॅन’चे दिनेश नायडू यांनी सांगितले.