रेल्वे डब्याच्या शौचालयातून रुळांवर मलमूत्र पडणे ही बाब इतिहासजमा करण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी २०१९ पर्यंत जैव शौचालय बसवण्यात येणार आहे. ‘इनॉक्युलम’ जिवाणूचा वापर करून काही डब्यांमध्ये पर्यावरणस्नेही शौचालय लावण्यात आले. रेल्वेने नागपुरातील मोतीबाग कार्यशाळेत ‘इनॉक्युलम प्रकल्प’ तसेच जैव शौचालय निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत. पुढील तीन वर्षांत शौचालयाचे बदलण्याचे उद्दिष्ट असल्याने नागपुरातील ‘इनॉक्युलम जनरेशन प्लॉन्ट’चा विस्तार करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेचा स्वतच्या मालकीचा नागपुरातील हा एकमेव ‘इनॉक्युलम जनरेशन प्लॉन्ट’ आहे.
प्रकल्पाची वैशिष्टय़े
मोतीबाग इनॉक्युलम प्रकल्प हा भारतीय रेल्वेचा एकमेव प्रकल्प आहे. मोतीबाग जैव शौचालय प्रकल्पाला तसेच देशातील इतर प्रकल्पांना येथून इनॉक्युलमचा पुरवठा केला जातो. प्रकल्पाच्या मुख्य हौदात इनॉक्युलम जिवाणूंचे संगोपन केले जाते. जिवाणू मानव, प्राणी आणि पक्ष्यांच्या विष्ठेचे विघटन करून पाण्यात रूपांतर करतात. या प्रक्रियेदरम्यान मिथेन वायू तयार होतो. तो बाहेर काढून एका चेंबरमध्ये गोळा केला जातो. या चेंबरची क्षमता दिवसाला ४ हजार ५०० लिटर एवढी आहे. या गॅसवर लोको-पायलट कॅन्टिनचा स्वयंपाक केला जातो. जळताना ज्योत निळी असल्यास जिवाणू योग्य प्रकारे विघटन प्रक्रिया करीत असल्याचे संकेत मिळतात.
प्रवाशांनी घ्यावयाची काळजी
प्रवाशांनी शौचालयात प्लास्टिक, पॉकेटबंद खाद्यपदार्थाचे, चॉकलेटचे रॅपर किंवा मुलांचे डायपर (लंगोट) टाकू नयेत. अशी काळजी घेतल्यास जैव शौचालय योग्य प्रकारे कार्य करील. त्यामुळे देखभाल-दुरुस्तीचा खर्च तर टळेलच, परंतु प्रवाशांना दरुगधीच्या त्रासापासून वाचता येईल.
काय आहे ‘इनॉक्युलम जनरेशन प्लान्ट’?
या प्रकल्पामध्ये ‘इनॉक्युलम’ या जिवाणूंचे उत्पादन केले जाते. या जिवाणूंचा वापर जैव शौचालयात केला जात जातो. जिवाणू मानवी विष्ठेचे रूपांतर पाण्यात करतात. शौचालयाच्या टाकीतील पाण्याची पातळी वाढली की आपोआप पाणी बाहेर पडत असते. मोतीबाग येथील या प्रकल्पासाठी शेण, पाणी, हौद, कूलिंग सिस्टमची आवश्यकता आहे. पहिल्या टाकीत शेण आणि पाणी यांचे मिश्रण तयार केले जाते. या हौदाची क्षमता १२०० लिटर प्रति दिवस आहे. यासाठी ४०० किलोग्रॅम शेण आणि ८०० लिटर पाणी लागते. शेणमिश्रित पाणी हे इनॉक्युलमचे खाद्य आहे. शेणमिश्रित पाणी पुढे १ लाख लिटर क्षमता असलेल्या एका मोठय़ा हौदात सोडण्यात येते. या हौदात २० डिग्री सेल्सिअस तापमानावर तग धरू शकणारे इनॉक्युलम जिवाणू ठेवण्यात आलेले असतात. त्यांना शेणमिश्रित पाणी खाद्य म्हणून दिले जाते. हे जिवाणू दिवसाला असंख्य जिवाणूंना जन्म देतात. एक लाख लिटर क्षमतेच्या हौदावर ८५ हजार लिटरनंतर ‘ओव्हर फ्लो’ देण्यात आला आहे. ओव्हर फ्लो होऊन निघालेले मिश्रण स्टोअर टँकमध्ये जमा केले जाते. या मिश्रणात इनॉक्युलम असते. तेथून आवश्यकतेनुसार जिवाणूंचे वितरण केले जाते. या स्टोअर टँकची क्षमता ३० हजार लिटर प्रतिदिवस आहे.
प्लान्ट क्षमता ५०० लिटर प्रतिदिवस
मोतीबाग कार्यशाळेत ‘इनॉक्युलम जनरेशन प्लॉन्ट’ची ५०० लिटर प्रतिदिवस उत्पादन क्षमता आहे. रेल्वेतील बायो टॉयलेट प्रकल्पासाठी १८ रुपये प्रतिलिटर किमतीने पुरवठा केला जातो. बंद डब्यात दोन महिन्यांपर्यंत जिवाणू सुस्थितीत राहतात. टँकर उघडल्यानंतर जिवाणूंचा वापर दोन दिवसांत करावा लागतो. प्राणवायूच्या संपर्कात आल्यास जिवाणू मरतात.
बायो टॉयलेट प्रोजेक्ट
रेल्वेच्या मोतीबाग कार्यशाळेत रेल्वे डब्यांसाठी जैव शौचालय तयार केले जाते. रेल्वे डब्याच्या खाली एक टाकी तयार केली जाते. त्याची क्षमता १२० लिटर असते. त्यात एकूण सात कप्पे असतात. ही बाहेरून लोखंडी आणि आतून प्लास्टिकची असते. त्यातील एका कप्प्यात इनॉक्युलम असते. कप्प्यांना रबरने सील केले जाते. विघटन प्रक्रिया झाल्यानंतर कार्बन डाय ऑक्साईड आणि पाणी बाहेर पडते.
इनॉक्युलम इतिहास
अन्टाक्र्टिकामध्ये इनॉक्युलम आढळून येतो. तेथे पेंग्विनची विष्ठा घनस्वरूपात आढळून येत नाही. शास्त्रज्ञ त्याचे कारण शोधत असताना इनॉक्युलमचा शोध लागला. पेंग्विनच्या विष्ठेचे विघटन करणारा जिवाणू इतर प्राण्यांच्या विष्ठेचे विघटन करू शकेल, असे संशोधकांना कळायला वेळ लागला नाही. पण अडचण होती, ते जिवाणू उणे ४० अंश सेल्सिअसमध्ये होते. नागपूरचे तापमान उन्हाळ्यात ४७ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. हे जिवाणू एवढय़ा तापमाणात तग धरू शकणार नव्हते. डीआरडीओच्या ग्वालियर येथील प्रयोगशाळेत या जिवाणूवर संशोधन करण्यात आले. जिवाणू २० अंश सेल्सिअस तापमानात जिवंत राहू शकेल आणि प्रजनन क्षमतादेखील कायम राहील या दृष्टीने संशोधन झाले.