लोकसत्ता टीम
यवतमाळ : जिल्ह्यात आज रविवारी सर्वत्र नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा दुर्गोत्सव असलेल्या यवतमाळला दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक देखावे साकारले आहेत. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात दोन हजार ७६६ दुर्गादेवींची स्थापना झाली आहे.
यवतमाळ शहरातील दुर्गोत्सव देशातील दुसर्या क्रमांकाचा असल्याने दूरवरून नागरिक नवरात्रोत्सव बघायला येतात. आकर्षक देखावे निर्मितीच्या कामाला दीड महिन्यांपूर्वी सुरुवात झाली, हे काम अंतिम टप्प्यात आले. परराज्यातील कारागिर हे देखावे साकारत आहे. वडगाव रोड, आर्णी नाका, राणाप्रताप गेट, दारव्हा नाका, छोटी गुजरी, पूनम चौक, स्टेट बँक चौक, गांधी चौक, शिवाजी चौक, लोखंडी पूल, लकडगंज येथील देखावे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जिल्ह्यात शहरी भागात ७११, ग्रामीण भागात दोन हजार ५० तर एक गाव एक दुर्गा ५६०, अशी एकूण दोन हजार ७६६ दुर्गादेवींची घटनास्थापना केली जाते. सार्वजनिक शारदा उत्सवदेखील याच कालावधीत साजरा केला जाणार आहे. शहरी भागात ११४, ग्रामीण भागात ४१९ तर एक गाव एक शारदा १३१, अशी एकूण ५३३ ठिकाणी शारदा देवीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
आणखी वाचा-वंचित विद्यार्थ्यांना पीएच.डी.ची संधी, ‘एकलव्य’चा देशातील पहिला उपक्रम
आज रविवारी सकाळपासून शहरात दुर्गा मंडळांनी देवींची वाजत गाजत मिरवणूक काढली. विविध ढोल ताशे पथक, सांस्कृतिक देखावे अनेक मंडळांनी मिरवणुकीत साकारले. सुभाष क्रीडा मंडळ वडगाव रोड, सिंधी कॉलनी, दर्डा नगर येथील मंडळांनी काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली.