बुलढाणा : गावकऱ्यांच्या एकजुटीचे प्रतीक आणि पोलिसांचा ताण कमी करणाऱ्या ‘एक गाव एक गणपती’ या अभियानाने जिल्हयात लोक चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. यंदा तब्बल ३०८ गावांत एकाच गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. शहरच काय गावातील गणेश मंडळ मध्ये कमालीची छुपी चुरस वा स्पर्धा दिसून येते. या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काही वर्षांत एक गाव एक गणपती या उपक्रमाने मूळ धरले आहे. यंदाचा गणेशोत्सव देखील या स्तुत्य परंपरेला अपवाद नाही. यावर्षी तब्बल गावात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. एकट्या बुलढाणा पोलीस उपविभागातच ८२ गावांतील गावकऱ्यांनी हा उपक्रम राबवून एकजूट दाखविली.
जिल्ह्यात यंदा १ हजार ४५ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. खामगाव उपविभागात याची संख्या लक्षणीय आहे. या काळात कायदा- सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी सुरक्षेचे नियोजन केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १० उप अधीक्षक, २९ पोलीस निरीक्षक, अडीच हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी व १५०० ‘होमगार्ड’ दिमतीला राहणार आहे. परजिल्ह्यातून कुमक मागविण्यात आली आहे.