वाशीम : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघासाठी शुक्रवारी सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. उन्हाची तीव्रता असतानाही सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२. ७४ टक्के मतदान झाले असून सरासरी ६० टक्के मतदान होईल, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम नादुरुस्तीचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
वाशीम जिल्ह्यातील एकूण तीन विधानसभेपैकी दोन मतदारसंघ यवतमाळ-वाशीम तर एक विधानसभा अकोला लोकसभा मतदार संघात समाविष्ठ आहे. जिल्ह्यात एकूण ९ लाख ७९ हजार २३७ मतदार होते. त्यापैकी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना झाला. या निवडणुकीमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला़. सकाळी ९ वाजेपर्यंत ७.६१, दुपारी १ वाजेपर्यंत ३२. ४५, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२. ७४ टक्के मतदान झाले. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांच्या नेतृत्वात प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले तर जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्रावर सजावट, मंडप, सेल्फी पॉईंट, महिलांना मेहंदी आदी सुविधा करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा – वर्धा : शहरी तुलनेत ग्रामीण भागात टक्का वाढला, महिला मतदारांमध्ये निरुत्साह
काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड
सकाळी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात किन्हीराजा, वाशीम शहरातील काही केंद्र व ग्रामीण भागात काही काळ ईव्हिएममध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया थांबली होती़ मात्र, जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेतल्याने काही वेळातच मतदान यंत्र सुरळीत होवून मतदान प्रक्रिया सुरु झाली तसेच मतदार यादीमध्ये अनेक ठिकाणी चुका असल्याने मतदारांना मनस्ताप सोसावा लागल्याचे चित्र होते.