यवतमाळ : अलिकडच्या काळात ‘ईव्हीएम’वरील निवडणूक प्रक्रियेबाबत विविध मतप्रवाह निर्माण झाले आहेत. ‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट पेपर’वर मतदान प्रक्रिया पार पाडावी, यासाठी आंदोलनेही झाली. हाच धागा पकडत येथील अमोलकचंद महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने आपण ‘ईव्हीएम’ ऐवजी मतपत्रिकेद्वारा निवडणूक प्रक्रिया घेतल्यास मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार आहोत’ असे पत्रच थेट जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. हे पत्र समाज माध्यमांत प्रचंड व्हायरल झाले असून, अनेकांनी या प्राध्यापकाच्या धाडसाचे कौतूक केले आहे.
येथील अमोलकचंद महाविद्यालयात प्राध्यापक असलेले डॉ. सागर शेवंतराव जाधव यांची २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्राध्यक्ष म्हणून ड्युटी लागली. तसे पत्र प्रशासनाने १४ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांना पाठविले. जगातील सर्वात महान लोकशाही राष्ट्राच्या निवडणूक महोत्सवात सहभागी होणे ही कोण्याही भारतीय व्यक्तीसाठी गौरवाची बाब आहे. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रा. डॉ. सागर जाधव यांनी प्रशासनाचे आभार मानले. आपण २००४ पासून मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सातत्याने निवडणूक ड्युटी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, आज देशभरात ईव्हीएम विरोधात वातावरण तयार झालेले आहे. भारतीय लोकशाहीसाठी ईव्हीएम प्रणाली घातक ठरणारी आहे, असे जनमानस बनले असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचेही ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू आहे.
हेही वाचा >>>‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….
भारताचे पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते ईव्हीएम विरोधात बोलत असल्याचा व्हीडीओ समाज माध्यमांत प्रसारित झाला आहे. ज्या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएमचा शोध लावला ते राष्ट्रसुद्धा निष्पक्षपणे निवडणूक पार पाडण्यासाठी ईव्हीएमचा वापर बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेत आहेत, आदी मुद्दे मांडले. तंत्रज्ञानामुळे अवकाशातील यान पृथ्वीवरून नियंत्रित करता येते. बँक खाते हॅक करून गैरव्यवहार करता येतो. त्याचप्रमाणे ईव्हीएमसुद्धा हॅक केले जावू शकते, याचे प्रात्यक्षिक अनेकांनी संवैधानिक मार्गांनी सिद्ध केलेले आहे. त्यामुळे ईव्हीएमद्वारा घेतल्या जाणाऱ्या निवडणुका भारतीय लोकशाहीसाठी अविश्वासार्ह असल्याचे, प्रा. डॉ. जाधव यांनी म्हटले आहे.
भारताचा एक नागरिक म्हणून, लोकशाहीच्या संरक्षणासाठी भारतीय संविधान अनुच्छेद १९ (१) (अ) द्वारे ईव्हीएमच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास असहमती नोंदवित असल्याचे त्यांनी प्रशासनास कळविले. मात्र ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर ही मतदान प्रक्रिया घेत असल्यास आपण सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याचेही डॉ. सागर जाधव यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>नवी मुंबई: पदपथावर बांधकाम व्यावसायिकाचे अनधिकृत कार्यालय
निवडणूक आयोग निर्णय घेईल
आपण प्रशासनाकडे आपले म्हणणे मांडले. आवक-जावकमध्ये पत्र दिले. तेथील अधिकाऱ्यांनी हा विषय आपल्या अखत्यारित नाही. निवडणूक आयोगच याबाबत निर्णय घेईल, असे सांगितल्याचे प्रा. डॉ. सागर जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. प्रशासनास पत्र दिल्याबाबत महाविद्यालयाकडून विचारणा झाल्याचेही डॉ. जाधव म्हणाले.