चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये ठेवण्यात आलेल्या गिधाडांना जीएसएम ट्रान्समिशन ट्रॅकिंग डिव्हाईस तंत्रज्ञान यशस्वीरित्या लावण्यात आले. ताडोब-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये २१ जानेवारी २०२४ ला जटायू संवर्धन केद्राची निर्मिती करण्यात आली होती. सदर केद्रामध्ये बी.एन.एच.एस. या संस्थेच्या पिंजोर येथील संशोधन केद्रातील धोकाग्रस्त व नष्टप्राय होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या १० पाढऱ्या पुठ्याचे गिधाड (White-rumped vulture) पक्षी आणण्यात आले होते. या व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात उभारण्यात आलेल्या प्री-रिलीज एवेयरीमध्ये (Pre-realise Aviary) तज्ञाच्या देखरेखित ठेवण्यात आले होते.
या सर्व गिधाडांना प्रथम या वनक्षेत्रातील वातावरणाची सवय व्हावी या हेतून प्री-रिलीज एवेयरीमध्ये ठेवण्यात आले होते. या गिधाडांचा मागील ६ महिन्यांचा दैनदिन व सूक्ष्म अभ्यास बी.एन.एच.एस. संस्थेचे वैज्ञानिक करत होते. या सर्व गिधाडांना निसर्गमुक्त करणे आवश्यक असल्याने ४ जुलै २०२४ ला बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई या संस्थेच्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी सर्व १० गिधाडांना GSM Transmission Tracking Device लावण्यात आले आहे.
हेही वाचा – वर्धा : एकतर्फी प्रेमातून युवतीवर कैचीने वार, माथेफिरू युवक…
सदर GSM डिवाईस हे युरोपमधून आयात केले आहे. सदर GPS Tag लावल्यानंतर दोन ते तीन दिवसाच्या निरीक्षणानंतर या गिधाडांना निसर्गमुक्त करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे या पक्ष्यांच्या रोजचा दैनदिन हालचालींची माहिती वैज्ञानिकांना होणार आहे. या अभ्यासातून गिधाड संवर्धन व संरक्षणासाठी उपाय-योजना निश्चित केली जाणार आहे.
या जटायू संवर्धन केंद्राची सुरुवात राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे (BNHS) अध्यक्ष प्रवीण परदेशी व संचालक किशोर रिठे यांच्या महत्वपूर्ण सहकार्यामुळे या वनक्षेत्रात पांढऱ्या पुठ्याच्या गिधाडांचे संवर्धन होण्यास बळकटी मिळत आहे.
हेही वाचा – यवतमाळ : नोकरीचा तिसराच दिवस अन काळाने साधला डाव…
या महत्वपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोळसा रुंदन कातकर, वनपाल एन.एल. सिडाम, बोटेझरी वर्तुळ, वनरक्षक निखील रामगीरकर व टीम, या व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, तसेच BNHS या संस्थेचे वैज्ञानिक डॉ. सचिन रानडे, डॉ. काझवी, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी निखील बांगर यांनी अथक प्रयत्न केले आहे. सदर प्रकल्प डॉ. जितेंद्र रामगावकर मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.