लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती: जुनी पेन्‍शन योजना लागू करण्‍याच्‍या प्रमुख मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेला कर्मचाऱ्यांचा संप उद्या, सोमवारी सातव्या दिवसात पोहोचतो आहे. दरम्यान आज, रविवार या सुटीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देत संपातील योगदान कायम ठेवले. दुसरीकडे, आंदोलन तीव्र करण्यासाठी उद्या सोमवारी २० मार्च रोजी ‘थाली बजाओ आंदोलन’ केले जाणार आहे.

संपकर्त्यांनी आज सकाळी दहा वाजेपासूनच आंदोलनाचे मुख्य केंद्र असलेल्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर गर्दी केली. नेहमीप्रमाणे घोषणाबाजी व निदर्शने केल्यानंतर त्यांनी आपसात बैठक घेत सोमवारी ‘थाली बजाओ’ आंदोलनाची घोषणा केली. आठवडाभराचा कालखंड लोटल्यानंतरही शासन ऐकत नसल्याने थाळीनाद करुन आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, असे यावेळी ठरविण्यात आले. समन्वय समितीचे पुढारी डी. एस. पवार, राजेश सावरकर, पंकज गुल्हाने, संजय राठी आदी यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा- बाप रे… संपामुळे रुग्ण मृत्यूचा टक्का वाढला!

संपामुळे नागरी सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावीत झाल्या आहेत. महापालिका, जिल्हा परिषद, आरटीओ ऑफीस, जिल्हाकचेरी, एसडीओ-तहसील कार्यालये, दवाखाने, शाळा-महाविद्यालये, कृषी विभाग आदी ठिकाणी सामान्य नागरिकांची नेहमी वर्दळ असते. परंतु गेल्या पाच दिवसांपासून कार्यालये ओस आणि कर्मचारी रस्त्यांवर अशी स्थिती असल्याने सामान्य नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व कार्यालयांमधील कर्मचारी संपावर गेल्याने ही वेळ ओढवली आहे. संपामुळे शिक्षण आणि आरोग्य सेवा काही प्रमाणात प्रभावित झाली आहे.

नवीन पेन्‍शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्‍शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान किमान वेतन देऊन त्‍यांच्‍या सेवा नियमित कराव्‍या, सर्व रिक्‍त पदे तत्‍काळ भरावीत, यासह संपकर्त्‍यांनी १८ मागण्‍या सरकारकडे केल्‍या आहेत.