मंदिरात भक्तीत तल्लीन भाविकांवर काळ बनून वादळ कोसळल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. पारस येथे बाबूजी महाराज संस्थांन मंदिरातील टिनशेडच्या सभामंडपावर सुमारे १५० वर्ष जुने एक मोठे वृक्ष उन्मळून पडले. त्याखाली दबून तब्बल सात भाविकांचा मृत्यू झाला. २६ जण जखमी झाले असून त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
जिल्ह्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. बाळापूर तालुक्यातील पारस गावात बाबूजी महाराज संस्थानामध्ये दर रविवारी सायंकाळी पश्चिम विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक येतात. संस्थानमध्ये रविवारी रात्री १० वाजता ‘दु:ख निवारण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाविक मोठ्या संख्येने एकत्र जमले. संस्थानमध्ये सायंकाळीची आरती सुरू असतांना अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी मंदिराच्या परिसरातील टिनशेडच्या सभामंडपाचा आसरा घेऊन भाविक उभे होते. मंदिराला लागून सुमारे १५० वर्ष जुने मोठे कडुलिंबाचे वृक्ष वादळामुळे अचानक उन्मळून सभामंडपावर कोसळले. सभामंडपातील ४० ते ५० भाविक त्याखाली दबले. या भीषण दुर्घटनेमुळे प्रचंड गोंधळ निर्माण होऊन दबलेल्या भाविकांनी एकच आक्रोश केला. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळा येत होता. या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी संस्थान गाठून स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. घटनास्थळावर जेसीबी आणि रुग्णवाहिकेला पाचारण करून बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू करण्यात आले. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी बाळापूर व अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले.
हेही वाचा >>>भंडारा : ‘आनंदाचा शिधा’ बुरशीजन्य; गरिबांच्या आरोग्याशी खेळ, रेशन दुकानावर कारवाईची मागणी
या दुर्घटनेत उमा महेंद्र खारोडे (५०, फेकरी, दीपनगर, भुसावळ), पार्वतीबाई महादेव सुशीर (५५, भालेगाव बाजार, ता.खामगाव, जि.बुलढाणा), अतुल श्रीराम आसरे (३५, बाभुळगाव, अकोला), मुरलीधर बळवंत अंबारखाने (५५, पारस, ता.बाळापूर, जि.अकोला), भास्कर अंबुलकर (५५, शिवसेना वसाहत, अकोला) २८ व ३५ वर्षीय दोन अनओळखी पुरुष असे एकूण सात जणांचा मृत्यू झाला. २६ जण जखमी असून त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहेत. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी घटनेबाबत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत केले. मदत व बचाव कार्य करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.
हेही वाचा >>>फडणवीसांना खारे पाणी पिण्याची, आंघोळ करण्याची विनंती करणार; ठाकरे गटाचा आजपासून अकोला-नागपूर मोर्चा
विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण घुगे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ व रुग्णालयात पोहोचून रुग्णांची विचारपूस केली. या दुर्घटनेमुळे पारससह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.