कविता नागापुरे, लोकसत्ता
भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज निघणार असून भंडारा-गोंदिया मतदार संघात आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख येऊन ठेपली मात्र उमेदवारचाच पत्ता नाही, अशी गत झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. एकीकडे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी भाजपाने २६७ उमेदवार घोषित केले आणि दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख येऊन ठेपली तरी या मतदार संघात भाजपाला उमेदवार देता आलेला नाही. महाविकास आघाडीनेही “पहले आप” चे धोरण अवलंबिले असून ते युतीचा उमेदवार जाहीर होण्याची वाट बघत आहे. या सर्वांमध्ये इच्छुक उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागला असून अद्याप मतदारसंघात प्रचार तोफा थंडच आहेत.
भंडारा-गोंदिया लोकसभेच्या उमेदवारीवरून मतदारसंघात भलताच पेच निर्माण झाला आहे. महायुतीच्या चर्चेमध्ये अद्यापही दावे आणि प्रतिदावे सुरू आहेत, तर युतीने घोषित केलेल्या उमेदवारावर आघाडीचा उमेदवार ठरणार आहे. त्यामुळे महायुतीला शह देण्यासाठीच सज्ज असलेल्या आघाडीने सध्या आपला पत्ता गुलदस्त्यात ठेवला आहे. त्यामुळे उमेदवाराचा हा गुंता कधी सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सुरुवातीला भाजपाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी आमदार डॉ. परिणय फुके या दोघांनीच प्रामुख्याने उमेदवारीसाठी दावेदारी केली होती. बाकी नावेही होती मात्र चर्चा या दोन नावांचीच. मात्र या दोन आजी माजी मधील तिकिटासाठीचे शीतयुध्द विकोपाला गेल्याने ही जागा आम्हाला सोडावी अशी थेट भूमिका अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी घेतल्याने कथानकात अचानक ट्विस्ट आले आणि भाजपाचे वरिष्ठ नेते पुन्हा चर्चेच्या मोडवर गेले. समाज माध्यमांवर पुन्हा नव्या नावांची चर्चा रंगू लागली. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, महिला उमेदवार म्हणून वर्षा पटेल, सरीता फुंडे अशी समाज माध्यमांतून नव्याने चर्चेला आली. महायुती काय निर्णय घेणार यावर पटेलांची आगामी गणिते अवलंबून आहेत.
‘ तुमचे फायनल होत नसेल तर आम्ही लढण्यास सज्ज आहोत’ असे राष्ट्रवादीच्या गोटातून बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीचा गुंता अधिक वाढला आहे. महायुतीमध्ये नक्की जागा जाणार कोणाकडे याचीच चर्चा आहे. आता भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते भाजपाच्या इच्छूकांची केवळ आश्वासनांवर बोळवण करीत प्रफुल पटेलांची मर्जी रखतील की भाजपाच्याच शिलेदारांना रिंगणात उतरवतात हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र भारतीय जनता पार्टीच्या तिसऱ्या यादीची अद्याप प्रतीक्षा असून भाजपाा समर्थकांची अस्वस्थता शिगेला पोहचली आहे. महाविकास आघाडी व महायुतीत उमेदवार निश्चिती बद्दल अद्यापही अधिकृत चर्चा झाली नसल्याने कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याची युती आघाडीच्या कार्यकत्यांमध्ये उत्सुकता आहे. युती आणि आघाडीने लवकरात लवकर उमेदवार जाहीर केला नाही तर शिमग्याच्या तोंडावर “राजकीय बोंबा” मारण्यास सुरुवात होईल हे नक्की.
आणखी वाचा- मृतदेहाची अवहेलना! रस्त्यावरच दहन, गावात तणाव; जाणून घ्या सविस्तर…
महायुतीमध्ये बंडखोरीची ठिणगी?
जिल्ह्यात काम करणाऱ्या कोअर कमिटीने वरिष्ठ कार्यकारिणीला काय अहवाल दिला आहे. यावर उमेदवारीसाठी इच्छूकांचा निर्णय होणार आहे. या निर्णय प्रक्रियेमध्ये भाजपाच्या कोअर कमिटीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे भंडाऱ्याचा गुंता वाढला आहे. मात्र उमेदवारच निश्चित नसल्याने आधीच महायुतीमध्ये जातीय समिकरणाच्या आधारावर पक्षातील नेत्यांनी घेतलेली वेगळी भुमिका ऐन उमेदवारी घोषीत करताना बंडखोरीची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील जात समिकरणाला बळ देणाऱ्या जिल्हातील नेत्यांनी यावेळी वेगळी भूमिका घेतल्यास काय परिणाम होऊ शकते याचाही विचार भाजपाला करावा लागेल.
महाविकास आघाडी बुचकळ्यात
महाविकास आघाडी सुद्धा अजूनही उमेदवारी निवडीच्या बाबतीत बुचकळ्यात आहे. आ. नाना पटोले यांना उमेदवारीचे सर्व अधिकार आहेत. मात्र भंडाऱ्यात त्यांनी अजूनही भाष्य केलेले नाही. भंडाऱ्यामध्ये माजी आमदार चरण वाघमारे, मोहन पंचभाई, डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांचे नाव जसे आघाडीवर आहे. मात्र त्याबाबतीत अजूनही पटोलेंनी आपले पत्ते उघडलेले नाहीत.