अकोला : शहरातील सोनोने कुटुंबातील साठीतील दोन महिलांसह तिघांनी ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ सर केला. जगातील अतिशय खडतर, धोकादायक ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ गिर्यारोहणाची खडतर मोहीम तिघांनी अतिशय चिकाटीने फत्ते केली. या माध्यमातून त्यांनी नवा विक्रम रचला आहे.
शहरातील डॉ. अंजली राजेंद्र सोनोने, सुरेखा दिलीप सोनोने यांच्यासह डॉ. राजेंद्र सोनोने यांनी ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’पर्यंतच्या गिर्यारोहणाच्या खडतर मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेला २६ एप्रिल रोजी नेपाळमधील हिमालयाच्या अत्यंत दुर्गम भागातील गावातून सुरू केली होती. लुक्ला, फाकडींग, नामचे बजार, तेंगबोचे, देबोचे, फेरीचे, दिंगबोचे, लोबुचे, गोरखशेप, काला पत्थर असे खडतर गिर्यारोहण मजल दरमजल करीत ३ मे रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याची कामगिरी तिघांनी पूर्ण केली. एव्हरेस्ट बेस कॅम्प हा समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर एवढ्या उंचीवर आहे. त्याठिकाणी चोहोबाजूंनी बर्फच असून तापमान उणे २० डिग्री अंशसेल्सिअस असते. या खडतर परिस्थितीत त्यांनी हिमतीने सतत कोसळणारा पाऊस आणि हिमवर्षावाला तोंड दिले. पाठीवर १० ते १५ किलोचे ओझे घेऊन दररोज १० ते १२ तास हिमालय चढत जाण्याचा पराक्रम या तिघांनी केला. आपली मोहिम अवघ्या आठ दिवसांत त्यांनी पूर्ण केली. ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’वर मोठ्या दिमाखात त्यांनी तिरंगा फडकवला.
हेही वाचा >>> बुलढाणा : हे गाव लय भारी; येथील सर्वसमावेशक जयंतीच न्यारी! बुद्ध जयंती मध्येही सर्वधर्मीयांचा सहभाग
डॉ. अंजली आणि सुरेखा यांचा हा आयुष्यातील पहिला ट्रेक असूनसुद्धा त्यांनी दृढ निश्चयाने तो यशस्वी रित्या पूर्ण केला. ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ सर केल्यावर त्यांनी समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपण करून मित्रमंडळींना ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार केले. एकाच कुटुंबातील तिघांनी ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ सर करण्याची ही अकोलेकरांसाठी पहिलीच वेळ आहे. या माध्यमातून तरूण पिढीला एक नवा आदर्श घालून दिला आहे.
डॉ. सोनोनेंनी याआधीही केला पराक्रम अकोल्यातील डॉ. राजेंद्र सोनोने यांनी ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ पेक्षा ३०० मीटर अधिक उंचावर असलेल्या लेह येथील खरदुंगला पास सायकलने सर करण्याचा पराक्रम केला आहे.