नागपूर : राज्यासह देशात प्रत्येक पाचव्या गर्भवती महिलेला मधुमेह असल्याचे निरीक्षण मधुमेह तज्ज्ञांनी नोंदवले आहे. गर्भवतींमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय आहे.
जागतिक स्तराच्या विविध अभ्यासात दक्षिण आशियामध्ये प्रत्येक चौथ्या गर्भवती महिलेमध्ये मधुमेहाचे प्रमाण आढळले आहे. भारतात मात्र प्रत्येक पाचव्या गर्भवती महिलेत मधुमेह आढळला आहे. गर्भवतींमध्ये वाढते मधुमेहाचे प्रमाण चिंतेचा विषय असून, त्यावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. गर्भवती महिलेपैकी अनेकांचा मधुमेह प्रसूतीनंतर नाहीसा होतो. परंतु, या महिलांना मधुमेहाची जोखीम असते. भविष्यात या महिलांनी खबरदारी म्हणून आहार, खानपानाच्या सवयी व इतर गोष्टींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सोबत नित्याने मधुमेह तपासणी करून तज्ज्ञांचा सल्लाही घेणे फायद्याचे असल्याचे सुप्रसिद्ध मधुमेहरोग तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी सांगितले.
हेही वाचा – बुलढाणा : राज्यपाल रमेश बैस शनिवारी शेगावमध्ये
सध्या गर्भातील महिलांच्या बाळाला भविष्यात मधुमेह होऊ नये यावरही संशोधन सुरू आहे. त्यासाठी भारतातील ८० रुग्णांची निवड झाली असून हा प्रकल्प सुरू आहे. ही माहिती डॉ. गुप्ता यांनी बुधवारी रामदासपेठ येथील सुनील डायबेटिज केअर ॲन्ड रिसर्च सेंटर प्रा. लि.च्या रुग्णालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी डॉ. नितीन वडस्कर, डॉ. सरिता उगेमुगे, डॉ. कविता गुप्ता उपस्थित होत्या.
हेही वाचा – नागपूर : कोराडीतील प्रस्तावित वीज संचावरून वाद? पर्यावरणवाद्यांचा गंभीर आक्षेप
हॅलो डायबेटिज ॲकेडेमिया परिषद ९ जूनपासून
डायबेटिज केअर फाउंडेशन ऑफ इंडिया, सुनील्स डायबेटिज केअर ॲन्ड रिसर्च सेंटर प्रा. लिमी., जागतिक मधुमेह महासंघासह विविध वैद्यकीयशी संबंधित संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते ११ जून दरम्यान हाॅटेल सेंटर पाॅईंट येथे ‘हॅलो डायबेटिज ॲकेडेमिया’ परिषदेचे आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या ९ जूनच्या उद्घाटन कार्यक्रमाला पद्मभूषण के. श्रीनाथ रेड्डी, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. कमलाकर त्रिपाठी, डॉ. शशांक जोशी, डॉ. अनुज माहेश्वरी तसेच इतर विविध भागांतील तज्ज्ञ उपस्थित राहणार आहे.